लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ४ लाख ५९ हजार ६९२ बचत खाते उघडण्यात आले असून या माध्यमातून ५० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती शासनाने जाहीर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी देशातील सर्व नागरिकांचे बँकेमध्ये खाते असावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनधन योजना सुरु केली होती. झिरो बॅलेन्सवर हे खाते उघडण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ६९२ नागरिकांनी बँकेमध्ये खाते उघडले. त्यापैकी ३ लाख ३७ हजार २५३ जणांना बँकेकडून रुपी कार्ड देण्यात आले. या एकूण खात्यांच्या माध्यमातून बँकांकडे ५० कोटी रुपयांची ठेव जमा झाली असल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलेन्सवर बँकेत खाते उघडण्यात आले असले तरी या खात्यामध्ये ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास ते खाते बचत खात्यामध्ये रुपांतरीत होत आहे. बचत खात्यात हे खाते रुपांतरीत झाल्यानंतर बँकांच्या नियमानुसार या खात्यात बँकेने निश्चित केलेली किमान रक्कम ठेवावी लागत आहे. अन्यथा तेवढी रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड लावला जात आहे. तसेच या खात्यातून दर महिन्याला फक्त १० हजार रुपयेच काढता येत असल्याने ग्राहकांची गोची होत आहे.
परभणी : जन-धन योजनेत उघडले साडे चार लाख बँक खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:22 PM