लोकमत न्यूज नेटवर्कवालूर (परभणी) : वालूर परिसरातील शेतामध्ये संत बाळू मामा यांच्या पालखीचा आठ दिवस मुक्काम राहिला़ या काळात दररोज वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम पार पडले़ पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले़सेलू तालुक्यातील कुपटा फाटा येथून १७ एप्रिल रोजी संत बाळू मामा यांच्या पालखीचे वालूर गावात आगमन झाले़ सुमारे २ हजार मेंढ्यासह अनेक महंत या पालखी समवेत गावात दाखल झाले़ बुधवारपासून शनिवारपर्यंत रामभाऊ लक्ष्मण धापसे यांच्या शेतात बाळू मामांच्या पालखीचा मुक्काम राहिला़ १७ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी या पालखीचे स्वागत केले़ ही पालखी धापसे यांच्या शेतात मुक्कामी होती़ या काळात आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत़ सरपंच संजय साडेगावकर यांनी पालखीचे स्वागत करून आरती केली़ यावेळी व्यापारी शैलेश तोष्णीवाल, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ आबूज, सोपान रोकडे, पंचायत समिती सदस्य रुख्मिणबाई रोकडे, रमेश धापसे, बालाजी हरकळ, रामप्रसाद बादाड आदींची उपस्थिती होती़ शनिवारी सकाळी वालूर येथील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ या मिरवणुकीनंतर ही पालखी खेर्डा गावाकडे रवाना झाली़ सध्या खेर्डा येथे पालखी मुक्कामी आहे़ दरम्यान, पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माणिक गिणगिणे, नामदेव बालटकर, दत्ता तळेकर, गजानन रोकडे, बालाजी तळेकर, माणिक शेवाळे, सुंदर तळेकर, विश्वनाथ धापसे, दत्ता खरबे, गणेश खरबे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़बाळू मामा यांची पालखी गावात आल्याने वालूर व परिसरातील अनेक ग्रामस्थ वालूर येथे पालखीच्या दर्शनासाठी येत आहेत़ शनिवारी दिवसभर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती़ पालखी सोहळ्यामुळे गावांत मंगलमय वातावरण निर्माण झाले होते़ १७ ते २० एप्रिल या काळात वालूर येथे दररोज धार्मिक कार्यक्रम पार पडले़ बाळू मामांच्या पालखी समवेत आलेल्या महाराजांचे रात्री १० वाजेपर्यंत प्रवचन होत असे़ प्रवचनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला़ या महाप्रसादासाठी दररोज रात्री १० वाजेपर्यंत वालूरमध्ये भाविकांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळाले़
परभणी : बाळूमामांच्या पालखीचे वालूरमध्ये आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:35 AM