लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या विरोधात बंडखोरी करीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बंडखोर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत चारही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या विरोधात महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेनेच्या काही उमेदवारांनी बंड करीत अर्ज दाखल केले आहेत. तर परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने एमआयएमकडून अर्ज दाखल केला आहे. तर राकॉँच्या नगरसेविकेच्या पतीनेही एमआयएमकडून अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे.पाथरी विधानसभा मतदारसंघातही भाजप महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी अर्ज दाखल केले आहेत.चारही मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे पहावयास मिळत असून आता या बंडोबांचे बंड शांत करण्यासाठी प्रमुख उमेदवार कामाला लागले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवस असून, या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेयासंदर्भात बंडखोर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.शिवसेनेचे बंडखोर उमेदवारी मागे घेतील - बंडू जाधव४महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही. जिंतूर, पाथरी या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.४त्यांची समजूत काढली जाईल. हे उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध कुठेही बंडखोरी होणार नाही, अशी अपेक्षा आहे, असे खा. बंडू जाधव यांनी सांगितले.
परभणी : बंडखोरांच्या निर्णयाकडे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:24 AM