लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोने उजळवून देतो, असा बनाव करुन दोन भामट्यांनी सात तोळे सोने लांबविल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील रामकृष्णनगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री उशिरा दोघा भामट्यांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रामकृष्णनगर भागात रहिवासी असलेल्या एका महिलेच्या घरी दोन भामटे आले. आम्ही उजाला कंपनीचे कर्मचारी असल्याचे त्यांनी या महिलेला सांगितले. तसेच कोणत्याही धातूच्या वस्तू उजळून देतो, असे त्यांनी सांगितले. त्यावर या महिलेने तांब्याचे ग्लास त्यांच्याकडे दिले. या दोघांनी हे ग्लास चकचकीत करुन दिले. चांदीच्या चैनही त्यांनी उजळून दिल्या. त्यामळे महिलेचा या चोरट्यांवर विश्वास बसला. सोन्याचे दागिने उजळण्यासाठी मागितल्यानंतर महिलेने सोन्याचे दागिने त्यांच्याकडे दिले. हे दागिने उजळविण्यासाठी गरम पाणी लागते, असे सांगून गरम पाण्यात हे दागिने टाकले. मात्र त्याच वेळी या चोरट्यांनी महिलेची नजर चुकवित सोन्याचे दागिने लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सात तोळ्याचे दागिने घेऊन दोघे पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन गुन्हा नोंद झाला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत टाकरस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
परभणी : भामट्यांनी लांबविले ७ तोळे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:18 AM