लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : शेतीच्या सामायिक धुऱ्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील उमरा येथे ४ आॅक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी ५ आॅक्टोबर रोजी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.उमरा येथील मारोती यशवंत शेळके (३२) यांच्या कुटुंबियांची अंधापुरी शिवारात ११ एकर शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारी धनंजय माणिक कोल्हे यांची शेती आहे. कोल्हे आणि शेळके यांच्यात सामायिक धुºयातून अनेक दिवसांपासून वाद आहे. ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास याच वादातून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. या मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी मारोती शेळके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महादेव भागवत कोल्हे, विलास माणिक कोल्हे, धनंजय माणिक कोल्हे, कैलास माणिक कोल्हे, निवास विठ्ठल कोल्हे, मोहन विष्णू कोल्हे, सुनील विष्णू कोल्हे, अनिल भागवत कोेल्हे, योगेश ज्ञानोबा कोल्हे, गजानन विठ्ठल कोल्हे, सिद्धेश्वर भागवत कोल्हे, हनुमान भागवत कोल्हे हे लोखंडी गज व हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. विलास कोल्हे यांनी शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच महादेव कोल्हे, सिद्धेश्वर कोल्हे यांनीही मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या बाळासाहेब, यशवंत, लक्ष्मीबाई, कालिंदा यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या मारहाणीत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी मारोती शेळके यांच्या फिर्यादीवरुन पाथरी पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ६ आॅक्टोबर रोजी या प्रकरणात कलम ३०७ वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांनी दिली.
परभणी : उमरा येथे दोन गटांत मारहाण; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:28 AM