लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): महिलांचे आरोग्य रक्षण आणि चुलमुक्त देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना अंमलात आणली़ या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी सूट देण्यात आली; परंतु, आता या योजनेतील सिलिंडरसाठी लाभार्थ्यांना ९०६ रुपये मोजावे लागत आहेत़ त्यामुळे उज्ज्वला योजनेतील लाभार्थी त्रस्त झाले आहेत़दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंपाकासाठी मोफत जोडणी देणाऱ्या उज्ज्वला योजनेत दर महिन्याला सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे मोठा फटका बसत आहे़ पेट्रोल, डिझेल पाठोपाठ दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ होत आहे़ वाढत्या महागाईचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर होत आहे़ वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे़ एप्रिल महिन्यात ६७६ रुपयांना मिळणारे सिलिंडर आॅक्टोबर महिन्यात ९०६ रुपयांवर पोहचले आहे़ एका लाभार्थ्याला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानित मिळतात तर १३ व्या सिलिंडरसाठी संपूर्ण पैसे मोजावे लागतात़ १२ सिलिंडरची खरेदी करेपर्यंत गॅस कंपन्यांकडून लाभधारकांच्या खात्यावर सबसिडी जमा केली जाते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंपाकासाठी गॅस मिळावा, या उदात्त हेतुने उज्ज्वला योजना अंमलात आणली़ या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळाले असले तरी नवीन सिलिंडर खरेदी करण्यासाठी सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे लाभार्थ्यांच्या नाकी नऊ येत आहेत़
परभरणी : उज्ज्वला योजनेतील लाभार्थी झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:32 AM