लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल आवास लाभार्थी मोठ्या तयारीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र वेळेअभावी या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे देशभरातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला.या संवादासाठी परभणी जिल्ह्याची निवड झाली. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये उत्साह होता. निवडक पंधरा लाभार्थी ५ जून रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘व्ही.सी. रुम’मध्ये दाखल झाले. ९.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडीओ कॉन्फ्रन्सद्वारे थेट लाभार्थ्यांसमोर आले. सुरुवातीला मनोगत व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम आणि तामिळनाडू राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.तोपर्यंत नियोजित वेळ संपल्याने व्हीडीओ कॉन्फ्रन्स आटोपती घेण्यात आली. महाराष्टÑातील परभणी जिल्ह्याच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला.या व्हीडीओ कॉन्फ्रन्सच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका स्वतंत्र कक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाभार्थ्यांचा थेट संवाद ऐकण्याची व्यवस्था केली होती. या ठिकाणी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे आदींसह ग्रामीण भागातील लाभार्थी उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदी यांच्याशी थेट संवाद साधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एन.आय.सी. कक्षातील व्ही.डी.ओ. कॉन्फ्रन्स कक्षात व्यवस्था केली होती.लाभार्थ्यांनी केली होती तयारीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी उत्साही होते. त्यांची संपूर्ण तयारीही झाली होती. नियोजनानुसार महाराष्टÑाचा संवादासाठी पाचवा क्रमांक होता. मात्र ऐन वेळी बदल झाले असावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. नियोजनानुसार महाराष्टÑातील लाभार्थ्यांचा संवाद झाला असता. परभणीतून मानवत तालुक्यातील सुरेखा जडे, जिंतूर तालुक्यातील कोक येथील शाकेराबी शेख या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार होत्या, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी सांगितले.या लाभार्थ्यांची झाली होती निवडपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी परभणी जिल्ह्यातील निवड झालेले लाभार्थी : सुरेखा जडे, शाकेराबी शे. नूर, वैशाली रगडे, संतोष कदम, राधाजी डोळसे, बबिता नागरे, रामराव निखाते, बानूबी अय्युब खान, कुशावर्ती लोखंडे, कौसरबी फेरोज खान, लक्ष्मीबाई गायकवाड, केशरबाई मोरे, शिवाजी पवार, सुभद्राबाई धुळगुंडे, शिवराज वाघमारे.२०२२पर्यंत प्रत्येकाला घरइतर राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीबाला स्वत:चे घर तसेच शौचालय, स्वयंपकाचा गॅस उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही दिली.
परभणी : पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:50 PM