लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला़परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून जवळपास १९ गावांना वीज पुरवठा केला जातो़ त्यात टाकळी बोबडे गावाचाही समावेश होता़ या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली लाईन ही ३५ वर्षे जुनी आहे़ त्यामुळे तारा लोंबकळत आहेत़ खांब जीर्ण झाले आहेत़ ठिक ठिकाणी काही खांब तर वाकले आहेत़ त्यामुळे वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे़ याबाबत वारंवार महावितरणकडे निवेदने देऊन व मागणी करून कोणतीच कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी या गावांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी परभणी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी भजन, कीर्तन आंदोलन करण्यात आले़ या दरम्यान, आंदोलकांनी दिलेल्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर प्रभारी अधीक्षक अभियंता जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले़ जाधव यांनी मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ आंदोलनात किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खटींग, दिगांबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, राजू शिंदे, मारोती खटींग, सूर्यकांत पोते, सुधाकर खटींग, प्रसाद खटींग, श्याम पोते, गजानन पोते, गौतम येडे, जगन्नाथ दामोधरे, महंत गंगानंद सरस्वती, परमेश्वर पोते, छत्रगुण खटींग, रामचंद्र खटींग, अक्षय खटींग, माधव खटींग, रोहिदास खटींग, जगन्नाथ खटींग यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़