लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे.यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम होती. पावसाची प्रतीक्षा करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. शुक्रवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला. जिल्हाभरात सर्वदूर भिजपाऊस झाला आहे. रात्री ११ वाजेपासून अनेक भागात पावसाने हजरी लावली. त्यामुळे वातावरणात बºयापैकी गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ८७ टक्के पेरण्या झाल्या. शेतकऱ्यांनी जोखीम पत्करुन पेरा केला; परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. अंकुरलेली पिके कोमेजून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच मागील आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी अधिकच धास्तावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेला पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे.परभणी शहर आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला भुरभूर असलेला हा पाऊस काही वेळानंतर रिमझिम स्वरुपात बरसत राहिला. शनिवारी सकाळच्या सुमारासही मध्यम पावसाच्या दोन-तीन सरी कोसळल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाऊस कायम होता. पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. शहरासह पालम, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.पालममध्ये चिंतेचे वातावरण दूर४पालम तालुक्यात १९ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी पिके वाचविण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांचे चिंतेचे वातावरण काही काळासाठी दूर झाले आहे. यावर्षी तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद, संकरित ज्वारी या पिकांची कोरडी पेरणी केली आहे. अनेकांनी कापसाची लागवड उरकून घेतली होती. जुलै अर्धा संपत आला तरी पाऊस बरसत नसल्याने पिके सुकत होती. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने या पिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी देखील शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु होता.गंगाखेड तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी४दीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमेजत असलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला असून, पिके पुन्हा डोलू लागली आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत माखणी मंडळात सर्वाधिक १२ मि.मी., राणीसावरगाव मंडळात ८ मि.मी., गंगाखेड मंडळात ६ मि.मी. व महातपुरी मंडळात ३ मि.मी असा तालुक्यात ७.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे.सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस४शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक १६.३३ मि.मी., सोनपेठ तालुक्यात १३ मि.मी., गंगाखेड ७.२५ , पूर्णा ७.४०, सेलू २.४०, मानवत १.३३ आणि पाथरी तालुक्यात ०.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणीऊ भिजपावसाने पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:12 PM