लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठादाराकडून तांदुळ पुरवठा करण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मागील आठवडाभरापासून पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे काम ठप्प पडले आहे. परिणामी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी दररोज रिकाम्या हाताने परतत आहेत.शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी दिली जाते. जिल्ह्यात दररोज शाळांमधून ही खिचडी शिजवून विद्यार्थ्याना दिली जाते. यासाठी खाजगी पुरवठादारामार्फत शाळांना तांदूळ आणि धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो. त्याचे कंत्राटही राज्यस्तरावरुन देण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन पहिली ते पाचवी वर्गासाठी प्रति विद्यार्थी प्रति दिन १०० ग्रॅम आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी प्रति विद्यार्थी प्रति दिन १५० ग्रॅम या प्रमाणे तांदळाची मागणी नोंदविली जाते. तालुकास्तरावरुन आलेली ही मागणी जिल्हा परिषदेमार्फत पुरवठादाराकडे पाठविली जाते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील शाळांना तांदूळ आणि धान्याचा पुरवठा केला जातो. दोन महिन्यातून एकवेळा हे धान्य पुरवठा केले जातो. मात्र मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्याला लागणाऱ्या तांदळाचा पुरवठाच झाला नाही. दोन महिन्यांचा साठा संपल्याने आठवडाभरापासून शाळांमध्ये तांदूळ उपलब्ध नसल्याने खिचडी शिजविणे बंद आहे.परभणी जिल्ह्यासाठी सर्वसाधारणपणे ९०० मेट्रीक टन तांदळाची आवश्यकता आहे. औरंगाबाद येथील कंजुमर फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांना तांदळाचा पुरवठा केला जातो.नोव्हेंबर महिन्यात तांदुळ पुरवठ्याचे कंत्राट संपल्याने त्यापुढील काळात तांदळाचा पुरवठा कसा करायचा, या विषयी ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला तांदळाचा पुरवठा करताना विलंब लागत आहे.सध्या शाळांमध्ये उपलब्ध असलेला तांदूळ संपला असून अनेक शाळांत खिचडी शिजविणे बंद झाले आहे. काही शाळांमधून अशा तक्रारीही दाखल झाल्या. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात माहिती घेतली असता तांदळाचा पुरवठा करण्याचे काम सुरु झाले असून काही तालुक्यांना तांदूळ पोहोचता झाला आहे. येत्या काही दिवसांत सर्व तालुक्यापर्यंत तांदूळ पुरवठा होईल, अशी माहिती मिळाली.दरम्यान, राज्यस्तरावरुन शिक्षण विभागाने ठोस निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांना खिचडीपासून वंचित राहावे लागत आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत नसली तरी ग्रामीण भागात मात्र अनेक विद्यार्थ्यांना खिचडीविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.पर्यायी व्यवस्था न झाल्याने अडचण४परभणी जिल्ह्यातील शाळांना तांदळाचा पुरवठा करण्याचे कंत्राट नोव्हेंबर महिन्यात संपल्यानंतर नवीन कंत्राट देण्यासंदर्भात निर्णय घेण्यास विलंब झाला. मध्यंतरीच्या काळात शाळास्तरावर तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली झाल्या; परंतु, तोही निर्णय झाला नाही. त्यामुळे १० डिसेंबर रोजी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी राज्यस्तरावर बैठक झाली. त्यातही ठोस निर्णय झाला नसल्याने जुन्याच कंत्राटदाराने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा तांदूळ, धान्यादी मालाचा पुरवठा करावा, असा निर्णय झाला. त्यानंतर कुठे तांदळाच्या पुरवठ्याला सुरुवात झाली. सध्या जिल्ह्यात तांदूळ पुरवठा करण्याचे काम सुरु झाले आहे.तीन तालुक्यांपर्यंत पोहोचला तांदूळ४शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आतापर्यंत पाथरी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यांतील शाळांना तांदळाचा पुरवठा झाला आहे. परभणी महापालिकेच्या हद्दीत देखील तांदळाचा पुरवठा करण्यात आला असून पालम, गंगाखेड, सोनपेठ या तालुक्यातील काही भागात तांदूळ पोहोचता झाला असल्याची माहिती मिळाली.साडेसात लाख किलो तांदळाची मागणीपरभणी जिल्ह्यातून डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यासाठी ७ लाख ५० हजार ३२५ किलो तांदळाची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात पहिली ते पाचवी वर्गासाठी ४ लाख ५ हजार १७५ किलो आणि सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ३ लाख ४५ हजार १५० किलो तांदळाची मागणी नोंदविण्यात आली आहे. पाथरी तालुक्यासाठी ६३ हजार २५ किलो, मानवत ४२ हजार किलो, सेलू ७० हजार किलो, पूर्णा ५४ हजार किलो, पालम २८ हजार ९५०, परभणी २ लाख ७४ हजार ४५०, जिंतूर ९८ हजार, सोनपेठ २९ हजार १०० आणि गंगाखेड तालुक्यासाठी ९० हजार ७५० किलो तांदळाची आवश्यक आहे.
परभणी : ‘बिरबलाची खिचडी’ शिजेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:42 AM