परभणी : अविश्वासू भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:32 AM2019-09-25T00:32:37+5:302019-09-25T00:33:05+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकीकडे आक्रमकतेने प्रचार यंत्रणा राबवित असताना दुसरीकडे जिल्ह्यात अविश्वासू वातावरणामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेसची पक्षाऐवजी व्यक्तीकेंद्रित भूमिका दिसून येत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे वादावादी सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकीकडे आक्रमकतेने प्रचार यंत्रणा राबवित असताना दुसरीकडे जिल्ह्यात अविश्वासू वातावरणामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेसची पक्षाऐवजी व्यक्तीकेंद्रित भूमिका दिसून येत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे वादावादी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष असला तरी या पक्षाला गेल्या अनेक वर्षापासून विधानसभेचे खातेही उघडता आलेले नाही. असे असताना पक्ष संघटनेत फारसी सक्रियताही दिसून येत नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी चारही मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये काँग्रेसला चार ठिकाणी एकूण १ लाख ४८ हजार १८६ मते तर राष्ट्रवादीला एकूण २ लाख २३ हजार ६ मते मिळाली होती. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला तब्बल ७४ हजार ८२० मते अधिक मिळाली होती. शिवाय राष्ट्रवादीचे २ आमदार निवडून आले. काँग्रेसच्या मात्र परभणी व गंगाखेडच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून काँग्रेस पक्ष नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु, ही अपेक्षा फोल ठरली आहे. पक्षीय विचारांऐवजी व्यक्तीकेंद्रित विचार पद्धतीवर जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण सुरु आहे. आघाडीच्या जागा वाटपात पाथरीची जागा काँग्रेसकडे असून येथे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हे पाच वर्षापासून तयारी करीत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथे वरपूडकर यांना ५५ हजार ६३२ तर राष्ट्रवादीचे आ.बाबाजानी दुर्राणी यांना ४६ हजार ३०४ मते मिळाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळून येथे १ लाख १ हजार ९३६ मते मिळाली होती. आघाडीच्या बिघाडीचा येथे अपक्ष उमेदवार मोहन फड यांना फायदा होऊन एकूण ६९ हजार ८१ मिळवत त्यांनी विजय संपादन केला होता. २०१९ च्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरुन ठरल्या प्रमाणे येथे आघाडीच्या सूत्रानुसार काम झाले तर पाथरीची जागा आघाडीकडे राहू शकते; परंतु, काँग्रेस व राष्ट्रवादीत येथे फारसे सख्य नाही. व्यासपीठावर एकत्र दिसनारे येथील आघाडीचे नेते नंतर मात्र सोयीची भुमिका घेतात, हे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे येथील निकाल काय असू शकेल, याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. परभणी विधानसभेचे तिकीट काँग्रेसकडून तब्बल १६ इच्छुकांनी मागितले होते. जसे जसे दिवस गेले, तसे तसे इच्छुकही गायब होत गेले. आता फक्त तीन इच्छुक उरले असून त्यातील एका इच्छुकाने पक्षातही प्रवेश केलेला नाही. तरीही संबंधिताची उमेदवारी पक्की मानली जात आहे. परभणी मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद आहे. मनपा, पंचायत समिती पक्षाकडे असताना पक्षाचा मेळावा, शाखा स्थापना असे कोणतेही कार्यक्रम गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले नाहीत. त्यामुळे येथे पक्षाच्या ताकदीवर विजय मिळवायच कसा, असा सवाल जुन्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले सोनपेठ व गंगाखेडचे नगराध्यक्ष पक्षाच्या एकाही बैठकीला उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य वंचित बहुजन आघाडीचे काम करीत आहेत. तरीही पक्ष नेतृत्वाला त्याबद्दल काहीही वाटत नाही. पूर्णा, गंगाखेड येथेही काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. याकडे पाहण्यास कोणत्याही वरिष्ठ नेत्याला वेळ नाही. परिणामी काँग्रेसमधील मरगळ कायम असून नेत्यांच्या तडजोडीच्या राजकारणात पक्षीय विचार अडगळीत पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाभरात स्वयंपूर्ण
४आघाडीतील जागा वाटपानुसार जिंतूर आणि गंगाखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची फारसी ताकद नाही. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्याच ताब्यात सेलू पालिका वगळता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत.
४जिंतूर तालुक्यात काँग्रेस संपल्यात जमा आहे. सेलू तालुक्यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत. असे असले तरी आ.भांबळेच मतदारसंघात स्वयंपूर्ण नेते आहेत. गंगाखेडमध्येही काँग्रेसची अशीच स्थिती आहे.
४नगरपालिकेत पक्षाचे काही नगरसेवक आहेत; परंतु, या मतदारसंघात पक्षीय कार्यक्रम क्वचितच झालेला दिसून येतो. येथे आ.मधुसूदन केंद्रे यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. परभणी मतदारसंघातही राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे; परंतु, या मतदारसंघात सध्या गटबाजी उफाळून आली आहे.
४अंतर्गत वादातून अॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या शहरातील हस्तक्षेपाला माजी महापौर प्रताप देशमुख, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांच्यासह १० पेक्षा अधिक नगरसेवकांनी विरोध केला आहे.
४त्यानंतर आता पक्षाच्या शहराध्यक्षपदी प्रा.किरण सोनटक्के यांची निवड करण्यात आली. तरीही हा वाद कायम आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. आ.बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी पालिकेवर अनेक वर्षापासून एकहाती सत्ता असून स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही राष्ट्रवादीचा दबदबा आहे.
४सोनपेठमध्ये माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ताकदीचा काँग्रेसला लाभ होऊ शकतो; परंतु, दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
दोन्ही पक्षांत समन्वयाचा अभाव
४परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेश नागरे यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. नागरे यांनी त्या दृष्टीकोनातून कामही सुरु केले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी नागरे यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी उघडपणे त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी मांडली.
४काँग्रेसची उमेदवारी कोणाला असावी, ही त्या पक्षातील अंतर्गत बाब असताना आ.दुर्राणी यांनी त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे त्यावेळी राष्ट्रवादीचे अॅड.स्वराजसिंह परिहार यांच्या गटाने स्पष्ट केले होते. असे असताना काँग्रेसच्या एकाही नेत्याने या संदर्भात शब्द काढला नाही. त्यामुळे आघाडीत समन्वयाचा अभाव यानिमित्ताने दिसून येत आहे.