लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नम्रता, चारित्र्य, नितीमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे बौद्ध धम्मात पालन केले जाते. त्यामुळेच थायलंड, कोरिया, जापान सारख्या देशांचा विकास झालेला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचारणात आणा, असे आवाहन डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी येथे धम्मदेसना कार्यक्रमात केले.परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील कृष्णाई ग्रीन पार्क येथे सोमवारी सायंकाळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भन्ते काश्यप यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की, जगाला आज तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. अशांत वातावरणात तथागतांचे विचारच जगाला तारु शकतात. बुद्ध देशांमध्ये सूक्ष्म पद्धतीने धम्म आचरण केले जाते. नम्रता, चारित्र्य, नीतिमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे त्या देशांमध्ये पालन होते. त्यामुळेच थायलंड, दक्षिण कोरिया, जपान सारख्या देशांचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कलावतीबाई हत्तीअंबिरे, भीमराव जोंधळे हे थायलंडमधील बौद्धस्थळांना भेटी देऊन आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मध्यप्रदेशातील इंदोर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांचाही उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य संघटक डी.एन.दाभाडे, डॉ.श्रीराम मसलेकर, पीआरपीचे नेते गौतम मुंडे, प्रा.डॉ.भीमराव खाडे, प्रा.संजय जाधव, डॉ. बी.टी.धुतमल, डॉ. प्रकाश डाके, अॅड.रवि गायकवाड, अॅड. महेंद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी तर आभार प्रदर्शन मंचक खंदारे यांनी केले.
परभणी : ‘जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचरणात आणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:00 AM