लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : खचाखच प्रवाशांनी भरलेली बस, रस्त्यातील चढ चढत असताना अचानक मागे सरकत असल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांचा, चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर ताबा मिळविल्याने जीव भांड्यात पडल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिंतूर-कावी रस्त्यावर घडली़जिंतूर आगाराची एमएच २० बीएल- ०३०१ क्रमांकाची बस जिंतूरहून कावीकडे मंगळवारी ३़३० वाजता निघाली़ जिंतूरचा या दिवशी बाजाराचा दिवस असल्याने बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते़ प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बस दुपारी ४ च्या सुमारास कावी शिवारातील चढाजवळ आली़ त्यानंतर चालकाने ही बस चढावरून गावाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला; परंतु, अचानक ब्रेक लागत नसल्याने पुढे जाणारी बस मागे सरकू लागली़जवळपास २० फूट ही बस मागे गेल्याने काय होत आहे, हे प्रारंभी प्रवाशांना समजेना़ त्यानंतर मात्र चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आतील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली़ काही क्षणातच चालकाने प्रसंगावधान राखून सदरील वाहनावर नियंत्रण मिळविले़ त्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ परिणामी, आतील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला व थांबलेल्या बसमधून सर्व प्रवासी उतरले़ नंतर चालकाने बसमध्ये बसण्याची प्रवाशांना विनंती केली; परंतु, भयभीत झालेल्या प्रवाशांनी नंतर त्या बसकडे ढुंकूनही पाहिले नाही़ मिळेल त्या वाहनाने त्यांनी गाव गाठले़ परिणामी, चालक व वाहकाला रिकामी बस घेऊन जावी लागली़ या घटनेचीच गाव परिसरात चर्चा होताना दिसून आली़भंगार बसमुळे झाली घटना४जिंतूर आगाराकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही़ आगारात मोठ्या प्रमाणात भंगार बसेस असून, या बस प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहेत की नाही? याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी न करताच त्या रस्त्यावर धावतात़ कावीला जाणारी ही अशीच बस होती.४शिवाय आगारातील अनेक बसच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तर काही बस पाऊस पडल्यावर गळतात़ परिणामी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या बसमधून प्रवास करावा लागतो़ विशेष म्हणजे बसचे टायर नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची नामुष्की एसटी महामंडळाला अनेक वेळा आली आहे़ तरीही एसटी महामंडळाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत़ परिणामी एसटी महामंडळाच्या कारभाराबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे़
परभणी: चढावरून बस मागे सरकत असल्याने प्रवाशांत घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:36 PM