परभणी : शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या बस मधील इंजिनला अचानक आग लागल्याने चालकाची केबिन जळून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
बीडहुन किनवटकडे जाणारी एमएच 20 बीएल 1906 क्रमांकाची बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास परभणी बस स्थानकात दाखल झाली. यावेळी यावेळी आतील प्रवासी उतरत होते तर खाली उभे असलेले प्रवासी बस मधील प्रवासाच्या उतरण्याची वाट पाहत होते. तर चालक व वाहक बसमधून खाली उतरले. त्याचवेळी अचानक चालकाच्या केबिनमधून धूर येऊ लागला. काही प्रवाशांच्या लक्षात ही बाब येताच आरडा ओरड सुरू झाली. त्याच वेळी केबिनमधील इजिनने पेट घेतला. त्यामुळे गोंधळ करीत वेगाने प्रवासी बस मधून उतरले. बस स्थानकात आग विझवणारी यंत्रणा तात्काळ उपलब्ध नसल्याने मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. काही क्षणातच हा बंब बस स्थानकात दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तो पर्यंत चालकाची केबिन जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.