परभणी : गुणवत्ता तपासणी न करताच शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील खांडवा भागातील डोंडवाडा येथील मे़ सारस अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक मंडळ व झोनल मॅनेजर यांच्याविरुद्ध परभणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या १० हजार ४०० तक्रारी दाखल झाल्या आहेत़ त्यापैकी ६ हजार ३०० तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत़ या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील कृषी निविष्ठांचे गुणवत्ता सनियंत्रण निरीक्षक अनिलकुमार जोशी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री १०़४६ वाजता फिर्याद दाखल केली़ त्यात म्हटले आहे की, सारस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीने गुणवत्ता तपासणी न करता जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाणांची विक्री केली़ शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी केले़ त्याची उगवण न झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या़ त्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने शेतात तपासणी केली़ त्यामध्ये १५ ते २० टक्केच उगवण झाल्याचे दिसून आले़ तसेच मे़ सारस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या बियाणांचे नमुने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस़बी़ आळसे यांनी ५ जून रोजी परभणी येथील मोंढा भागातील स्वाती अॅग्रो एजन्सीज् येथून, तर बियाणे निरीक्षक के़व्ही़ आळणे यांनी पालम येथील जिजाई अॅग्रो सर्व्हिसेस येथून १ जून रोजी घेतले़
निकृष्ट बियाणे पुरवठा केल्याचे निष्पन्नसोयाबीन उगवणीचे प्रमाण कमीत कमी ७० टक्के येणे आवश्यक असताना प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात एका ठिकाणी ३९ टक्के तर एका ठिकाणी ४८ टक्के आले़ त्यामुळे सदरील कंपनीने शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे सदरील कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे़ त्यास कंपनीचे झोनल मॅनेजर राजेंद्र बापूरावजी गुलकरी (५१) व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे़ त्यावरुन कंपनीचे झोनल मॅनेजर गुलकरी व संचालक मंडळाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.