लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला परभणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या संदर्भात सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी दिलेली माहिती अशी- शहरातील साखला प्लॉट येथे ६ जुलै २०१७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपी राजू पवार याने त्याची पत्नी लता पवार ही अंगणात भांडे घासत असताना तू कोठे व कोणा सोबत गेली होतीस, असे विचारुन तिच्यावर संशय घेतला. घरातील खोरे घेऊन पत्नीच्या डोक्यात घाव घातले. यात लता ही रक्ताच्या थारोळ्यात पडली. लता पवार ही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असतानाही तिला उपचारासाठी दवाखान्यात न नेता आरोपी राजू पवार याने खोरे जवळच्या खोलीत लपवून ठेवले व तो नांदेड येथे पळून गेला होता. घटनेत लता पवार हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात राजू पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.तपासी अंमलदार एम.के. ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले. मयत व आरोपीच्या मुलीने प्रत्यक्ष घटना पाहिली होती. तिने ही घटना जशीच्या तशी सांगितली. तसेच वैद्यकीय पुरावाही महत्त्वपूर्ण ठरला. परिस्थितीजन्य पुरावा, रासायनिक प्रयोगशाळेतून दिलेला अहवाल, तपासी अधिकारी एम.के. ठाकूर यांची साक्षही महत्त्पूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा साक्ष पुरावा व अभियोग पक्षाने सिद्ध केलेल्या बाबीवरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी आरोपीस जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड सुनावला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी काम पाहिले.
परभणी येथील प्रकरण :पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:53 PM