लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बारावी परीक्षेमध्ये गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कॉपी करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीची आणि १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. २ मार्च रोजी दहावी इयत्तेची द्वितीय भाषा उर्दू व इंग्रजी माध्यमाची परीक्षा पार पडली. २ हजार ८८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ९८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. तर बारावीची परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये गणित व संख्याशास्त्र आणि एमसीव्हीसीचा पेपर झाला. तर दुपारच्या सत्रात व्यावहारिक हिंदी विषयाचा पेपर पार पडला. गणित विषयासाठी १५४ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर व्यावहारिक हिंदी विषयाला केवळ १ विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. गणित व संख्याशास्त्र विषयाच्या दरम्यान तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ३ आणि नवीन रत्नापूर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ५ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. कॉपीविरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. दहावीच्या परीक्षेसाठी ५४ तर बारावीच्या परीक्षेसाठी ५० बैठे पथक कार्यरत होते. तसेच प्रत्येकी ३३ भरारी पथकांनी कॉपीविरोधी मोहीम राबविली.
परभणी: कॉपी करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:14 AM