लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील नऊही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित विशेष सभेत निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील नऊही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबर महिन्यातच संपला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे सभापती व उपसभापतीच्या निवडीला राज्य शासनाने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी या पंचायत समितींच्या सभापती पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी २७ डिसेंबर रोजी सभापती व उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच यासाठी नऊही ठिकाणी पीठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी सेलूकरीता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, परभणीसाठी डॉ.सूचिता शिंदे, गंगाखेडसाठी सुधीर पाटील, पाथरीसाठी व्ही.एल.कोळी, जिंतूरसाठी तहसीलदार सुरेश शेजूळ, पूर्णेसाठी पल्लवी टेमकर, पालमसाठी ज्योती चव्हाण, मानवतसाठी डी.डी.फुफाटे व सोनपेठसाठी अशिषकुमार बिराजदार यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.परभणी, गंगाखेड, मानवत व पूर्णेकडे जिल्ह्याचे लक्ष४परभणी पंचायत समितीत सध्या काँग्रेस व भाजपाची युती आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली होती. आता राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाआघाडी सत्तेत आहे. त्यामुळे परभणीतही ही आघाडी अस्तित्वात येते की नाही, याकडे लक्ष लागले आहे.४गंगाखेडमध्ये रासपा-भाजपा व शिवसेनेची सत्ता आहे. आता येथे महाविकास आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीचे काही सदस्य फुटून विरोधी पक्षासोबत सहलीवर गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पाच सदस्यांच्या नावे येथे व्हीप काढला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत व्हीपचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. महाविकास आघाडी दोन्ही पदांवर कब्जा करणार की रासप- भाजपा, राष्ट्रवादीच्या बंडखोर सदस्यांना सोबत घेऊन सत्ता कायम ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.४पूर्णा पंचायत समितीत राष्ट्रवादी- भाजपाची सत्ता आहे. येथेही महाविकास आघाडी सत्तेत आल्यास भाजपा सत्तेबाहेर फेकला जावू शकतो. मानवतमध्ये शिवसेनेत दोन गट आहेत. एका गटाने काँग्रेसला सोबत घेऊन सभापतीपद मिळविले आहे. त्यामुळे शुक्रवारी येथे काय नवीन घडामोडी घडतात, हा ही उत्सुकतेचा विषय आहे. पालममध्ये घनदाट मित्र मंडळ व राष्ट्रवादीची युती असून शुक्रवारच्या निवडणुकीत ही युती कायम राहण्याची दाट शक्यता आहे.४उर्वरित सेलू, पाथरी, जिंतूर व सोनपेठ या चार पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून तेथे या पक्षाचे वरिष्ठ नेते जो उमेदवार ठरवतील तो सभापती व उपसभापतीपदावर विराजमान होईल.
परभणी : नऊही पंचायत समित्यांच्या सभापतींची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:34 AM