लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लवकरच देशात चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्या़ उर्मिला जोशी-फलके यांनी येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चाईल्ड लाईन, बाल कल्याण समिती आणि लॉयन्स क्लब प्रिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर रोजी बाल दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी न्या़ जोशी बोलत होत्या़ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.संजय केकान, चाईल्ड लाईनचे समन्वयक संदीप बेंडसुरे यांची उपस्थिती होती. अॅड.संजय केकान यांनी बालकांचे हक्क व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. बालकांचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण, खेळ, नाटके, स्पर्धांमध्ये सहभागी करुन सुप्त गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संदीप बेंडसुरे यांनीही शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. यावेळी न्या़ उर्मिला जोशी म्हणाल्या, बालक हे त्याच्या आई-वडिलांचे अनुकरण करीत असतात. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लवकरच देशात चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जातील. अशा प्रकारच्या न्यायालयामुळे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविक केले़ रवी पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.गजानन चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपस्थित बालकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अधीक्षक ए.सी. वाघमारे, अनंत सोगे, कृष्णा फुलारी, संदीप गडगिळे, तेजस्वीनी कांबळे, सय्यद इशरत, अर्चना दुधाटे, रेखा सुर्वे, संतोष डोणे तसेच बाल कल्याण समिती व लायन्स क्लब प्रिन्सच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब परभणी प्रिन्सच्या वतीने न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ आणि बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. प्रफुल्ल पाटील दंत महाविद्यालयातील डॉक्टरांनी बालकांची दंत तपासणी केली.
परभणी : लवकरच चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:02 AM