लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील जुना पेडगावरोड रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून मनपा याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.शहरातील रायगड कॉर्नर ते कॅनॉलपर्यंतच्या २ कि.मी.च्या रस्त्यावर दररोज १० ते १५ हजार नागरिकांची ये-जा असते. या रस्त्यावर भारतीय बालविद्यामंदिर व अभिनव विद्यामंदिर अशा दोन शाळा, बँका, हॉस्पिटल आहेत. त्यामुळे येथील वर्दळ अधिक आहे. असे असताना या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात आता या खड्ड्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. परिणामी या खड्ड्यातून रस्ता शोधताना वाहनधारक व नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. या भागातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वेळा नागरिकांनी केली; परंतु, महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिवाय या भागातील नगरसेवकांकडूनही सक्रियता दाखविली जात नाही. परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यातील पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी लक्ष देऊन त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जून सामाले, बी.एन.स्वामी, अजीत अंबोरे, निलेश लिंगायत, अभय हिंगोलीकर, प्रथमेश जैस्वाल, दुर्गेश खोलगडे आदींनी केली आहे.
परभणी: खड्ड्यातील पाण्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:36 AM