परभणी शहरात सोमवार ठरला आंदोलनवार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:25 AM2018-09-04T00:25:57+5:302018-09-04T00:36:32+5:30
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
देशभरात पेट्रोल व डिेझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत आहे. परिणामी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात सर्वाधिक पेट्रोल व डिझेलचे दर परभणीत आहेत. त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील राष्ट्रवादी भवन येथून सायकल मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या सायकल मोर्चात आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, किरण सोनटक्के, दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते, अशोक काकडे, अजय चौधरी, संदीप माटेगावकर, भावनाताई नखाते, नंदाताई राठोड, जलालोद्दीन काजी, इमरान लाला, सुरेंद्र रोडगे, सुमंत वाघ, मो.गौस, अमोल पाथरीकर, संजय खिल्लारे, अली पाशा, दशरथ सूर्यवंशी, रत्नाकर शिंदे, सिद्धार्थ भराडे, मदन भोसले, सुभाष कोल्हे, परमेश्वर शिंदे आदी सहभागी झाले. वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास सायकल मोर्चा पोहचला त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन येथे सायकल मोर्चाद्वारे पोहचले. यावेळी मार्गदर्शन करताना आ.दुर्राणी म्हणाले की, इतर देशांना ४० रुपयांनी पेट्रोल निर्यात करणारे केंद्र सरकार जनतेला मात्र ८८.३३ रुपये प्रति लिटरने पेट्रोल देत आहे. ही सर्वसामान्यांची लूट आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सायकल मोर्चाचा समारोप करण्यात आला.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनांनीही सहभाग नोंदवून पाठिंबा दिला.
मराठवाड्यात परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणे आवश्यक असताना राज्य शासनाने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. त्यामुळे परभणीवर अन्याय झाल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात खा. जाधव यांच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, अच्युत महाराज दस्तापूरकर, संतोष मुरकुटे, सूर्यकांत हाके, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, राम खराबे पाटील, मीनाताई परतानी, सखुबाई लटपटे, अतुल सरोदे, संजय सारणीकर, माणिक पोंढे, प्रभाकर वाघीकर, अर्जून सामाले, आयएमएचे अध्यक्ष डॉ.राजू सुरवसे, किर्तीकुमार बुरांडे, विलास बाबर, डॉ.राजगोपाल कालानी, हफीज चाऊस, विजय वाकोडे, सुरेश वंजारी, अॅड. अशोक सोनी, अॅड. दीपक देशमुख, अॅड. पी.एम. कुलकर्णी, अॅड. राम चव्हाण, अॅड. सुभाष इंगळे, अॅड. एम.ए.गफार, अॅड. मनोज तोष्णीवाल, अॅड. राम चव्हाण, लक्ष्मीकांत क्षीरसागर, विष्णू मुरकुटे, रणजीत गजमल, अॅड. बाबुलाल मोदानी, अॅड. एस.आर. देशमुख, नरेंद्र झांजरी, गंगाधर जवंजाळ, रामेश्वर आवरगंड, गजानन जोगदंड, अॅड. विजय देशमुख, विलास कौसडीकर, विजय सराफ, मोईन मौली, संतोष एकलारे, मो. मुसा युसूफ, प्रकाश कुलकर्णी, तानाजीराव दळवी, एकनाथ साळवे, सुधीर मांगुळकर, भगवान शेळके, वैजनाथ काळदाते आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
पहिल्यांदाच नेते सायकलवर दिसले
पेट्रोल व डिेझेलच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या सायकल मोर्चात पक्षाचे बहुतांश नेते सायकलस्वार झाल्याचे दिसून आले. काही नेते पहिल्यांदाच सायकलवर दिसल्याने जनतेतूनही या आंदोलनाला एक प्रकारे समर्थन मिळाल्याचे दिसून आले. वसमतरोडवर हे आंदोलन पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. वसमत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे या खड्ड्यामधून मार्ग काढताना सायकलस्वारांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे पहावयास मिळाले.
विविध पक्षांतील नेत्यांच्या आंदोलनास भेटी
शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या या आंदोलनास महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजूलाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी भेटी दिल्या. यावेळी जिल्हा वकील संघानेही या आंदोलनास पाठिंबा देऊन परभणीकरांच्या हितासाठी वकील संघ सदैव जनतेच्या पाठिशी राहील, असे संघाचे अध्यक्ष अॅड. दीपक देशमुख यांनी सांगितले. अॅड.अशोक सोनी म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उस्मानाबादपेक्षा परभणीच सरस आहे. तरीही परभणीवर अन्याय झाला आहे. या विरोधात लढून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणूत.
वैद्यकीय महाविद्यालय आणणारच -जाधव
परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील ओपीडी मराठवाड्यात सर्वात मोठी आहे. सर्वच बाबींवर परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सरस आहे. तरीही जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय परभणीला कोणत्याही परिस्थितीत आणणारच आहे. या आंदोलनांतर्गत आता ११ सप्टेंबर रोजी ११ वी ते पदव्युत्तरचे विद्यार्थी, सर्व डॉक्टर्स, सुजान नागरिक आदींचा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढणार असल्याचे खा. जाधव म्हणाले.