लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रस्त्यांची कामे मनपाने हाती घेतली असून, अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे लवकरच शहरात रस्त्यांची कामे होणार असल्याने खड्ड्यांच्या त्रासातून मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे़शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे़ खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत़ त्यामुळे महानगरपालिकेने रस्त्याचे काम हाती घेतले असून, लवकरच या रस्त्यांच्या कामालाही सुरुवात होणार आहे़दलित वस्ती योजना, दलितोत्तर योजना, रस्ता अनुदान योजना आदी योजनांमधून रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्यापैकी काही कामांच्या निविदा प्रक्रियाही झाली असून, काही कामे निविदास्तरावर आहेत़ शहरात लवकरच रस्त्यांची कामे होणार असल्याने नागरिकांना मात्र खड्ड्यांपासून मुक्तता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अपना कॉर्नर ते खंडोबा बाजार हा ३०० मीटर अंतराचा सिमेंट रस्ता तयार केला जाणार असून, त्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे़ तसेच तंदूर हॉटेल समोरील २०० मीटर अंतराच्या सिमेंट रस्त्यासाठीही कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत़ साधारणत: २० लाख रुपये किंमतीचा हा रस्ता असून, दलितोत्तर योजनेतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे़ अपना कॉर्नर ते खंडोबा बाजार हा रस्ता रस्ता अनुदान योजनेतून तयार केला जाणार आहे़ या दोन्ही रस्त्यांसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत़रस्त्यांच्या कामांबरोबरच जिल्हा स्टेडियम मार्केट परिसरातील चौकाच्या सुशोभिकरणाचे कामही मनपाने हाती घेतले आहे़ या कामासाठीही १४ नोव्हेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत़ साधारणत: ३० लाख रुपये खर्च सुशोभिकरणावर होणार आहे़ जिल्हा स्टेडियमसमोरील रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाले असून, मुख्य चौकाचे सुशोभिकरण शिल्लक आहे़ या सुशोभिकरणाचे कामही महापालिकेने हाती घेतले आहे़ त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांमध्ये शहरात रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होण्याची शक्यता आहे़ मागील काही वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांची ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.डॉक्टर लेन रस्त्याचीही : होणार निर्मिती४निरज हॉटेल ते आण्णाभाऊ साठे चौक हा बसस्थानकाकडे जाणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून उखडला आहे़ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती़ विशेष म्हणजे, या परिसरात खाजगी दवाखान्यांची संख्या अधिक असून, रस्ता खराब असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता़ या रस्त्याचे कामही महापालिका लवकरच हाती घेणार आहे़ ४५० मीटर अंतराच्या या रस्त्यासाठी दलितेत्तर विकास निधीमधून ५० लाख रुपयांची तरतूद केली जाणार असून, या रस्त्याच्या निविदाही लवकरच काढल्या जाणार आहेत़४त्याचप्रमाणे जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम ते हडको हा १२५० मीटर अंतराचा रस्ता तयार करण्याचेही नियोजन मनपाने केले आहे़ दलित वस्ती जोड रस्ता अंतर्गत या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढील आठवड्यात या रस्ता कामाच्या निविदाही काढल्या जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़दलित वस्तीत कामांचे नियोजन४महापालिकेंतर्गत शहरातील दलित वस्तींमध्येही रस्ते, नाली आणि इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ २०१७-१८ मध्ये दलित वस्ती विकास योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून ही कामे केली जाणार आहेत़ येत्या आठवडाभरात या कामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू होईल़
परभणी शहर : अडीच कोटींच्या खर्चातून होणार रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:46 PM