लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दिवाळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच पटीने वाढल्याने या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पटीपेक्षाही अधिक दर वाढविले आहेत. परिणामी प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून नाईलाज असल्याने प्रवासीही खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत.मागील काही वर्षांपासून शासनाच्या वाहतूक सेवेच्या बरोबरीने खाजगी वाहतूक सेवाही विकसित झाली आहे. वातानुकुलीत ट्रॅव्हल्सच्या मध्यमातून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात; परंतु, खाजगी प्रवासी वाहतुकीच्या दरांविषयी नियमांचे उल्लंघन करीत मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार या काळात होतो. दिवाळी आणि इतर मोठ्या सणांच्या काळात बाहेरगावाहून परभणी शहरात येणाºया प्रवाशांची संख्या वाढते. दरवर्षीच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवास भाड्यात दुप्पट, तीनपट वाढ केली आहे. परभणी शहरातून पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स सेवा उपलब्ध आहे.परभणी ते पुणे या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची संख्या असल्याने या प्रवासासाठीचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सर्वसाधारणपणे परभणी ते पुणे या प्रवासासाठी ६०० रुपयापर्यंत दर आकारले जातात. राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच अध्यादेश काढून सीझनच्या काळात परभणी ते पुणे या मार्गावरील वातानुकूलित प्रवासासाठी १२३६ रुपयापर्यंत दर वाढविण्यासाठी परवानगी दिली आहे; परंतु, प्रत्यक्षात या काळामध्ये १६०० रुपयापर्यंतचे दर खाजगी वाहतूकदारांकडून घेतले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. परभणी शहरातून नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे या शहराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे परभणी ते पुणे या मार्गावर नेहमीच प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे येथून परभणीत येणाºया प्रवाशांचा ओढा वाढतो आणि दिवाळी संपल्यानंतर परभणीतून पुण्याकडे जाणाºया नागरिकांची संख्या अधिक असते. या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी मोठ्या प्रमाणात दर वाढविले आहेत. प्रवाशांना मात्र अधिकचे पैसे मोजून दिवाळीचा आनंद घ्यावा लागत आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक४खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी शासनाचे निर्बंध आहेत; परंतु, नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक केली जाते. सर्वसाधारणपणे एका ट्रॅव्हल्समधून ३० प्रवाशांना प्रवास करण्याचा परवाना असतो. मात्र गर्दी लक्षात घेऊन यापेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. विमा कंपनीही केवळ ३० प्रवाशांचाच विमा उतरविते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर प्रवाशांना नुकसान भरपाईही मिळणे अशक्य होते. तसेच या ट्रॅव्हल्स गाड्यांची फिटनेस तपासणी करणे बंधनकारक असताना ही तपासणीही केली जात नाही. परिणामी प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे.बस, रेल्वेलाही वाढली प्रवाशांची गर्दी४खाजगी प्रवासी वाहतुकी बरोबरच एस.टी.महामंडळाच्या बससेवेला आणि रेल्वेगाड्यांनाही प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवाळी सणाच्या काळात बुकींग उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. रेल्वेचे आरक्षणही उपलब्ध नसल्याने प्रवासी खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतात. त्यामुळे जादा दर आकारुन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र दिवाळी सुट्यांमध्ये व्यस्त आहेत.
परभणी :ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:31 AM