लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात मंगळवारी श्वान पथकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्ह्यासह नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील श्वानपथकांनी सहभाग नोंदविला होता.जिल्हा पोलीस मुख्यालयात २३ सप्टेंबरपासून पोलीस कर्तव्य मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक यांचे प्रतिनिधी, पोलीस उपाधीक्षक सुरेश वानखेडे यांनी दिवसभरातील या स्पर्धांचा आढावा घेतला.मंगळवारी सकाळपासूनच पोलीस दलातील वेगवेळ्या गटामधील स्पर्धा पार पडल्या. त्यात श्वान पथकांच्या स्पर्धेने लक्ष वेधून घेतले. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले श्वानपथक विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वापरले जाते. येथे पार पडलेल्या मेळाव्यात या श्वान पथकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बॉम्बचा शोध घेणे, स्फोटकाचा शोध घेणे या स्पर्धेबरोबरच श्वानांची शिस्त आणि नम्रता या बाबींचीही स्पर्धा घेण्यात आली. त्याच प्रमाणे बॉम्बशोधक नाशक पथकाचीही स्पर्धा पार पडली.मंगळवारी पार पडलेल्या इतर स्पर्धांमध्ये संगणक सायबर विभाग, घटनास्थळाचे निरीक्षण करणे, पोट्रेट पार्ले ही एखाद्या व्यक्तीच्या निरीक्षणानंतर त्या व्यक्तीविषयी माहिती लिहिण्याचीही स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, ठसे तज्ज्ञांच्या स्पर्धा पार पडल्या. दिवसभराच्या या सत्रात पार पडलेल्या स्पर्धांमधून विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी तंत्र परिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. पुणे, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद या ठिकाणाहून हे परीक्षक परभणीत दाखल झाले आहेत.समारोप कार्यक्रमात होणार बक्षीस वितरणतीन दिवसांच्या पोलीस कर्तव्य मेळाव्याचा २५ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होत असून त्यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित केले जाणार आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.तत्पूर्वी बुधवारी सकाळी श्वानपथकाची माग काढण्याची स्पर्धा तसेच इतर स्पर्धा होणार आहेत. पोलिसांचे संचलन, ध्वजहस्तांतरण आदी कार्यक्रम होणार असून सायंकाळी समारोपीय कार्यक्रम होत आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या निमित्ताने पोलीस दलातील विविध विभागांच्या कामकाजांचे सराव ही या निमित्ताने होत आहेत.
परभणी : श्वानपथकाच्या स्पर्धेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:38 AM