लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाजपा सरकारकडून नुसताच घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. प्रत्यक्षात काहीच कृती केली जात नाही. त्यामुळे हे खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार, अशीच म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात बोलताना केली.काँग्रेसच्या वतीने बुधवारी शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.अशोक चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वसंतराव पुरके, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, खा.हुसेन दलवाई, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, आ.डी.पी.सावंत, माजी आ.उल्हास पवार, शरद रणपिसे, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ.सुरेश देशमुख, महापौर मीनाताई वरपूडकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, जयश्री खोबे, लियाकत अली अन्सारी, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, रात्र वैºयाची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र असो की राज्यातील भाजपा सरकारने जनतेला निवडणुकीत भरपूर आश्वासने दिली. परंतु, त्याची काडीचीही अंमलबजावणी केली नाही. निव्वळ घोषणांचा पाऊस या सरकारकडून पाडला जात आहे. त्यामुळे हे खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार असेच म्हणण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जनतेमधील संताप पाहता पुढीलवेळी सत्तेत येऊ की नाही, याची सरकारला भीती वाटत आहे. त्यामुळे कदाचित डिसेंबर २०१८ मध्ये निवडणुका होऊ शकतात. काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी बोलताना माजी खा. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार नसून ते अदानी-अंबानी यांच्यासाठीचे सरकार आहे. देशात २०१८ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावेळी माजीमंत्री वसंत पुरके यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. देशात धर्मांधता वाढली आहे. स्वातंत्र्य, समतेची गळचेपी होत आहे. राजसत्तेवर धर्मसत्ता प्रभावी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भाजपा सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी कामाला लागावे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आ. शरद रणपिसे यांनी काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आपल्या भाषणात नमूद केले. माजी आ.उल्हास पवार यांनी मार्गदर्शन करताना राज्यातील भाजपा- शिवसेना सरकारवर जोरदार टीका करुन या सरकारला सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही घेणे-देणे नाही, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी काँग्रेस सेवादलाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना सलामी देण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भगवान वाघमारे, माजूलाला, समशेर वरपूडकर, रविराज देशमुख, गणेश देशमुख, नागसेन भेरजे, रवि सोनकांबळे, सुहास पंडित, सचिन जवंजाळ, खानम दुर्राणी, मलेका गफ्फार, प्रेरणाताई वरपूडकर, वंदना पवार, रत्नमाला सिंगणकर, जानुबी, जयश्री जाधव, नागेश सोनपसारे , महेश कांकरिया, विशाल बुधवंत आदींची उपस्थिती होती.गारपिटीचा प्रश्न विधीमंडळात मांडणारगारपिटीने सर्वत्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ४८ तासांत या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते; परंतु, ७२ तास उलटले तरी अद्याप पंचनामे सुरु झालेले नाहीत. शिवाय नुकसान झालेल्या भागांची राज्य सरकारच्या एकाही मंत्र्याने पाहणी केलेली नाही. राज्यात गारपिटीने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे; परंतु, सरकारने त्यांना कोणतीही मदत दिलेली नाही. या असंवेदनशील सरकारने शेतकºयांचा अंत पाहू नये, असा इशारा माजी आ.सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत खा.अशोक चव्हाण यांनी दिला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याची अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. परंतु, त्याची पूर्तता कशी करणार, याबाबत मात्र माहिती सांगितली नाही. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाºया सैनिकांचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस हर्षवर्धन पाटील, भालचंद्र मुणगेकर, चारुलता टोकस, माजी आ.सुरेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
परभणीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर : अशोक चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल ; खोटारडे सरकार अन् फसवणूक दमदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:11 AM