लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत.नागरी भागामध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत नगरपालिकांना घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. ७ नगरपालिकांसाठी २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते; परंतु, आतापर्यंत केवळ ६२१ घरकुले बांधून पूर्ण झाली असून ८७९ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तर ५१० घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरुच झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू शिल्लक नाही. त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाल्याचे दिसत आहे.वाळू उपलब्ध नसल्याने सर्वच बांधकामे ठप्प आहेत. त्यात घरकुल बांधकामांचाही समावेश आहे. अलीकडच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना टोकन देऊन वाळू उपलब्ध करुन दिली जात असली तरी प्रत्यक्षात वाळू मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रशासकीय मंजुरीनंतर वाळू उपलब्ध करुन घेणे लाभार्थ्यांसाठी जिकीरीचे होत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी वाळू देण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात या बांधकामांना गती मिळाली नसल्याचे दिसत आहे.गंगाखेड शहरात सर्वाधिक घरकुले४रमाई योजनेअंतर्गत गंगाखेड शहरामध्ये ४०१ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १६० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. ४७ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असून ११९ घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरु झाले नाही. जिंतूृर शहरात १३४ पैकी ६२, पाथरी शहरात ३३४ पैकी ८५, सेलू शहरात २९३ पैकी ७३, मानवतमध्ये २८३ पैकी ६४, पूर्णा ७०० पैकी ८७ आणि सोनपेठ शहरामध्ये २३२ पैकी ९० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.१९ कोटी ५८ लाखांचा खर्च४रमाई आवास योजनेंतर्गत नगरपालिका क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी १९ कोटी ५८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर १२ कोटी २८ लाख ८३ हजार रुपये शिल्लक आहेत.४या योजनेंतर्गत गंगाखेड नगरपालिकेला ४ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ३ कोटी ७० लाख ५३ हजार रुपये खर्च झाले आहेत. जिंतूर नगरपालिकेला १ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १ कोटी ८७ लाख ७९ हजार रुपये खर्च करण्यात आले. पाथरी नगरपालिकेला ७ कोटी ९ लाख २८ हजार रुपये प्राप्त झाले. त्यापैकी ३ कोटी ५२ लाख १५ हजार रुपये खर्च झाला. सेलू नगरपालिकेला ५ कोटी १५ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झाला असून ३ कोटी १९ लाख १५ हजार रुपये योजनेवर खर्च झाला आहे. पूर्णा नगरपालिकेला ७ कोटी ४६ लाख ६५ हजार रुपये निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ३ कोटी २३ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. सोनपेठ नगरपालिकेला ३ कोटी २४ लाख ५ हजार रुपये निधी उपलब्ध झाला असून २ कोटी २७ लाख १८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.४पाथरी नगरपालिकेत ३ कोटी ५७ लाख आणि पूर्णा नगरपालिकेमध्ये ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित आहे. तर सेलू पालिकेत १ कोटी ९६ लाखांचा निधी शिल्लक आहे.
परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:15 AM