परभणी : पाणीपुरी खाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपी पाणीपुरी चालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे.
या प्रकरणाची सहाय्यक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी दिलेली माहिती अशी, परभणी शहरातील वांगी रोड भागातील शेख हबीब शेख अमीन कुरेशी यांनी २१ मे २०१६ रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानुसार शेख हबीब यांचा भाऊ शेख युनूस शेख अमीन हा पाणीपुरी खाण्यासाठी गेला होता़ त्यावेळी पाणीपुरी व्यावसायिक बालाजी नरहरी रेवणवार (३५) व शेख युनूस यांच्यामध्ये पाणीपुरी देण्याच्या कारणावरून वाद झाला़ या वादातच पाणीपुरी चालक रेवणवार याने कांदा कापण्याच्या बताईने शेख युनूस यांच्या छातीत वार केले़ यात शेख युनूस यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ तपासी अंमलदार एसक़े़ देशमुख यांनी घटनेचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले़ हे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयासमोर चालविण्यात आले़ सरकार पक्षाच्या वतीने एकूण १३ साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या़ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात घटनेचे कथन केले़ तसेच वैद्यकीय पुरावाही महत्त्वपूर्ण ठरला़ आरोपीने खून करण्यासाठी वापरलेली बतई देखील सापडली़ घटनेतील परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळाचा पुरावा, रासायनिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावरून दोष सिद्ध झाला़ तपासी अधिकारी एसक़े़ देशमुख यांची साक्षही महत्त्वपूर्ण ठरली़ दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी आरोपी रेवणवार यास जन्मठेप (अजन्म कारावास) आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली़ तसेच दंड न भरल्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली़ या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी काम पाहिले.