लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : घटस्फोटित पत्नीशी झालेल्या वादातून तिच्या मामाचा खून केल्या प्रकरणी आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़या प्रकरणाची माहिती सहाय्यक सरकारी वकील निलीमा कोकड यांनी दिली़ त्यानुसार प्रियंका संतोष सोनवणे या राहुलनगर भागात त्यांच्या घरी असताना घटस्फोटीत पती संतोष आश्रोबा सोनवणे (रा़ धांडे गल्ली, बीड) हा त्यांच्या घरी आला़ गेटसमोर जोरजोरात ओरडून शिवीगाळ केली़ यावेळी प्रियंका सोनवणे यांनी तिचे मामा सुनील ग्यानोजी भराडे यांना बोलावून घेतले़ सुनील भराडे यांनी घटनास्थळी आल्यानंतर आरोपी संतोष सोनवणे यांनी चाकुने त्यांच्यावर वार केले़ यात ते गंभीर जखमी झाले़ उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी प्रियंका सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आश्रोबा सोनवणे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला़ पोलिसांनी तपासा दरम्यान, पुरावे जप्त करून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले़ प्रमुख जिल्हा व सत्र न्या़ उर्मिला जोशी-फलके यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली़ एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले़ साक्षीपुराव्या अंती न्या़ उर्मिला जोशी-फलके यांनी आरोपी संतोष सोनवणे यास जन्मठेप व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास २ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता डी़टी़ गांजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता निलीमा कोकड यांनी काम पाहिले़
परभणी न्यायालयाचा निकाल: खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:46 AM