लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात परभणी तालुक्यातील कारेगाव व शहापूर येथे तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात निकृष्टतेचा कळस गाठल्याची बाब बुधवारी रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत उघडकीस आली़जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विकास कामांकरीता राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे़ परंतु, या निधीतून केली जाणारी काही ठिकाणची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने शासनाचा या योजनेमागचा उद्देश फोल ठरत आहे़ असाच काहीसा प्रकार परभणी तालुक्यातील शहापूर व कारेगाव येथे उघडकीस आला आहे़ कारेगाव व शहापूर येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये २३ लाख १७ हजार ६२४ रुपयांचा निधी सिमेंट नाला बांधासाठी मंजूर करण्यात आला़ त्यानंतर जालना येथील लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ सदरील कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले; परंतु, या कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे काही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यामध्ये कामासंदर्भातील गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी या संदर्भात आदेश काढून ५ सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती़ स्वत: जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर हे समितीचे अध्यक्ष तर रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियानच्या नोडल अधिकारी स्वाती सूर्यवंशी या सदस्य सचिव आहेत़ या शिवाय समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पार्डीकर, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एम़व्ही़ कोणगुते आणि वाप्कोस या अशासकीय संस्थेचे सदस्य अशी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली़ त्यानंतर उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भारतकुमार कानिंदे, कार्यकारी अभियंता कोणगुते व अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी या चार सदस्यांच्या पथकाने ९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, या सिमेंट नाला बांधाचे निकृष्ट काम चव्हाट्यावर आले़ सदरील कंत्राटदाराने या बांधाचा पाया भरताना सिमेंटचा वापर करणे आवश्यक होते; परंतु, चक्क दगड आणि वाळुचे पोते त्यामध्ये टाकून त्यावर बांध उभारण्यात आल्याचे दिसून आले़ शिवाय या बांधाची उंची पुरेशी ठेवली गेली नाही़ कामात निकृष्ट साहित्य वापरल्याचे दिसून आले. तसेच सदरील सिमेंट नाला बांधाचे खोलीकरणही व्यवस्थित झालेले नाही़ प्रशासनाने दिलेल्या निकषानुसार हे काम आढळले नाही़ त्यामुळे या बांधामध्ये फारसे पाणीही जमा होणार नाही, हे पथकाच्या प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले़ याबाबतचा तपासणी अहवाल पथकाकडून जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाणार आहे़‘लघुसिंचन’च्या दुर्लक्षामुळेच निकृष्ट काम४कारेगाव-शहापूर येथील कामावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे़ लघु सिंचन (जलसंधारण) या विभागाचे पूर्वी सेलू येथे कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय होते़ जवळपास दोन वर्षापूर्वी हे कार्यालय जालना येथे हलविण्यात आले़ या कार्यालयामार्फत परभणी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे केली जातात़ या कार्यालयाचे अधिकारी परभणीत फारसे नसतात़ ते जालन्याहूनच या कामांचा कारभार पाहतात़ त्यामुळे या विभागांतर्गत होणारी कामे दर्जेदार होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत़ त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे़कंत्राटदाराला टाकले काळ्या यादीत४कारेगाव-शहापूर येथील सिमेंट नाला बांधाचे काम परभणी येथील कुरेशी मोहम्मद फैय्याज अहमद या कंत्राटदाराला देण्यात आले होते़ सदरील कंत्राटदाराचे काम व्यवस्थित नसल्याने दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकले होते़ आता या कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाची बाब प्राथमिक चौकशीत चव्हाट्यावर आल्याने या कामावर खर्च केलेला २३ लाख १७ हजार ६२४ रुपयांचा निधी वाया गेला आहे़
परभणी : सिमेंट नाला बांधात निकृष्टतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:38 AM