लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.शहरात सर्वच वसाहतींमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १४ ते १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. ज्या भागात जलवाहिनी नाही. त्या भागातील अवस्था तर यापेक्षाही बिकट झाली आहे. खानापूरनगर परिसरात संभाजीनगर, अनुसयानगर, नृसिंहनगर, सारंगनगर, राजरत्ननगर, माळी गल्ली आदी ६ ते ७ वसाहती असून या भागात जलवाहिनीच्या माध्यमातून अद्यापही पाणीपुरवठा सुरु झाला नाही. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या भागातील जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. मात्र या जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. येथील नागरिकांनी मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करुन नवीन जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी केली आहे; परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची ओरड कायम आहे.खानापूर परिसरासह इतर वसाहतींमध्ये पाण्याची दाहकता शहरातील अन्य भागापेक्षा अधिक असताना महापालिका मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे दिसत आहे. सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो तो, पाण्याचा. संपूर्ण दिवस पाण्याच्या शोधात घालवावा लागतो. सद्यस्थितीला महापालिकेने या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे.पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येते. मात्र ६ -७ वसाहतींसाठी केवळ दोनच टँकर असल्याने टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकांना विकतचे पाणी घेऊन गुजरान करावी लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आणि महापालिकेला पाणीटंचाईची तीव्रता निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस उपायोजना झाली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जातो. खानापूर आणि परिसरात टँकर आल्यानंतर ते पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. अनेकवेळा पाण्यावरुन वादाचे प्रकारही घडत आहेत.मनपाने टँकर सुरु केले असले तरी पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. एकवेळा टँकर आल्यानंतर जास्तीत जास्त ४०० लिटरपर्यंत पाणी मिळते. हे पाणी ६ दिवसांपर्यंत पुरत नसल्याने टंचाई अधिक तीव्र झाली आहे. टँकर शिवाय कोणताही पर्याय सध्या तरी या भागात उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने लक्ष घालून खानापूर परिसरासाठी मूबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.टँकरसाठी करावा लागतो पाठपुरावा४खानापूर आणि परिसरातील वसाहतींमध्ये पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येत असले तरी या टँकरची वेळ निश्चित ठरलेली नाही. टँकर न आल्यास येथील नागरिकांना थेट पाण्याची टाकी गाठावी लागते.४ त्या ठिकाणी वसाहतींमध्ये टँकर सोडण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतरच टँकर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दिवसातील अर्धा अधिक वेळ टँकरच्या पाण्यासाठी जात आहे. मनपाने याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.... तर निकाली: निघू शकतो प्रश्न४खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली आहे. विशेष म्हणजे, या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले आहे; परंतु, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु केला नाही. त्यामुळे या भागात सद्यस्थितीला पाण्याचे हाल होत आहेत. या परिसरातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने नवीन जलवाहिनीतून तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला तर या संपूर्ण वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघू शकतो. नळाचे पाणी मूबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.४नवीन जलवाहिनीला अद्याप पाणीपुरवठा सुरु नसल्याने टंचाई वाढली आहे. मनपाने हे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.
परभणी : पाण्यासाठी घालवावा लागतो दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:21 AM