लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्याने सभागृह दणाणून गेले.मनपा स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बी.रघुनाथ सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या बंधूंचे निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नगरसेविका नाजनीन शकील पठाण यांनी पाकिस्तान मुर्दाबादची जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यांना इतर सदस्यांनीही त्यांना साथ दिल्याने सभागृह पाकिस्तान मुर्दाबादने दणाणून गेले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरु झाली. यावेळी शहरात टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्याचे आश्वासन सभापती देशमुख यांनी दिले. एका प्रश्नाच्या उत्तरात प्रभारी आयुक्त गायकवाड यांनी शनिवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. आठ दिवसांत ही मोहीम पूर्ण करणार असल्याचे त्या म्हणाल्या. नाली समोरील अतिक्रमणही हटविण्यात येणार असून ते पुन्हा होणार नाहीत, याची काळजी स्वच्छता निरिक्षकांनी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी देण्यात आली. शहरातील अनाधिकृत होर्र्ल्डींग्ज काढून ते जप्त करावेत, असे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. सदस्य प्रशास ठाकूर, इम्रान हुसेनी यांनी अनाधिकृत होर्ल्डीेग्ज लावणाऱ्यांवर मनपाने काय कारवाई केली, याची विचारणा केली. त्यावर ६ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे या कर्मचाºयांनी सांगितले. यावेळी नवीन नाट्यगृहाच्या निविदा मान्य झाल्या असून सुधारित दरानुसार हे काम करण्यास मान्यता दिल्याचे शहर अभियंता वसीम पठाण यांनी सांगितले. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक ते निरज हॉटेल या रस्ता कामास मंजुरी देण्यात आली. तसेच हॉटेल तंदूर ते मंगळवारा गल्ली या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.
परभणी : पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी सभागृह दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:35 AM