लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडून दिल्याने यावर्षी गोदावरीचे पात्र जानेवारी महिन्यातच कोरडे पडले होते. त्यामुळे गोदाकाठच्या दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. वाळू घाटांचे लिलाव उशिरा झाल्याने वाळू तस्करीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. अद्यापही गोदावरीच्या पत्रातून अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पात्रातील वाळू उपसा करून गावालगत अनेक ठिकाणी वाळू तस्करांनी साठे केले होते. हे वाळू साठे पकडण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार महसूलचे पथक गोदाकाठची पाहणी करीत आहे.७ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून महसूल विभागाच्या पथकाने वाळूचे साठे जप्त केले आहेत. सावंगी भुजबळ, पारवा, राहाटी दुटका, गुंज भोगाव, पिंपळगाव, मुरुड देव या गावातील परिसरात केलेले वाळू साठे पथकाने जप्त केले आहेत.या पथकात उपविभागीय अधिकारी कमलाकर फड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळ अधिकारी के.पी. शिंदे यांच्यासह तलाठी यांचा समावेश होता. पथकाच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.कारवाई होऊनही होतोय अवैध वाळू उपसापालम तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. या नदीपात्रातील वाळूला जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी मागणी आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाकडून वाळू घाटांचा लिलाव करण्यासाठी एप्रिल महिन्याचा मुहूर्त सापडला. लिलाव झालेले वाळू घाटही न्यायालयात असलेल्या याचिकेमुळे पुन्हा बंद करावे लागले. त्यामुळे तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला. या वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने कंबर कसली असून, कारवाई करून दंड वसूल केला जात आहे; ठोस कारवाई होत नसल्याने अवैध वाळू उपसा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे कारवाई केल्यानंतरही वाळू उपसा थांबत नसल्याचा प्रकार दिसून येत आहे.
परभणी : गोदाकाठच्या अवैध वाळूसाठ्यावर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:06 AM