लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेंतर्गत संबंधित परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा अपुऱ्या पडल्याने एका-एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार इंग्रजी पेपरच्या वेळी निदर्शनास आला आहे़जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे़ जिल्ह्यातील ५६ केंद्रांवर २४ हजार २६७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ ५६ केंद्रांपैकी काही परीक्षा केंद्रांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असल्याने त्याचा फटका परीक्षार्थ्यांना बसल्याची बाब पहिल्याच पेपरच्या दिवशी उघडकीस आली़ विशेष म्हणजे काही परीक्षा केंद्रांची चुकीची माहिती शिक्षण मंडळाला दिली असल्याने अधिकच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करताना संबंधित केंद्रप्रमुखांच्या नाकीनऊ आल्याचे स्पष्ट झाले आहे़ २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता़ त्यावेळी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील कै़ हरिबाई वरपूडकर उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ७७४ विद्यार्थ्यांसाठी २४ वर्ग खोल्या असताना एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसल्याचे आढळून आले़ या शिवाय पालम शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या केंद्रावरही ३ हॉलमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ अशीच स्थिती या तालुक्यातील मार्तंडवाडी येथील संत गाडगे बाबा ज्युनिअर कॉलेज येथे होती़या केंद्रावर दोन हॉलमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीमती शकुंतलाबाई कदम बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावरील १० वर्ग खोल्यांमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ ऐन वेळी विद्यार्थ्यांची बसण्याबाबत गैरसोय झाली असली तरी वेळेचे भान व परीक्षेची घाई यामुळे परिक्षार्थ्यांनी यासंदर्भात अधिकृतपणे कोणाकडेही तक्रार केलेली नाही.जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील भौतिक सुविधांचा वस्तुनिष्ठ अहवाल पुन्हा एकदा मागवून घेण्याची गरज शिक्षण मंडळाला भासणार आहे़ शिवाय या केंद्रांची पुनर्रचनाही आगामी काळात करावी लागणार आहे़ संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या अगोदरच केंद्रप्रमुखांना कळविली जाते़ मग त्या परीक्षार्थ्यांची बसण्याची व्यवस्था का केली गेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे़शाळांच्या तक्रारीनंतरही पाठविले विद्यार्थीजिल्ह्यातील काही शाळांनी आपल्याकडे कमी वर्ग खोल्या असल्याने ठराविक संख्येत विद्यार्थी परीक्षेसाठी पाठवावेत, असे पत्र शिक्षणाधिकाºयांना व शिक्षण बोर्डाला दिले आहे़ परंतु, या शाळांच्या परस्परच त्यांच्या केंद्रावर विद्यार्थी पाठविल्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला आहे़ त्यामुळेच वाढलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे़
परभणी : भौतिक सुविधांअभावी परीक्षार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:51 PM