लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बेशिस्त वाहनचालकांची संख्या शहरात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. काही वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. त्यांच्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. कान आणि खांद्यामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविण्याची कसरत सध्या अन्य वाहनधारकांची डोकेदु:खी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने शहरात स्टिंग आॅपरेशन केले. यामध्ये शहरातील वाहनधारकांना आपल्या जीवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा वाटत असल्याचे दिसून आले.परभणी शहरात मागील काही दिवसांपासून किरकोळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे. तसेच शहरातील प्रमुख चौक व रस्ते वाहतुकीने नियमित जाम होत आहेत. त्यातच कान आणि खांदामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविणाºयांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ३ ते ५ यावेळेत शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायणचाळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, उड्डाणपूल, जिल्हा परिषद, महाराणा प्रताप चौक, जाम नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिंतूररोड, वसमतरोड, गंगाखेडरोड आदी ठिकाणी सदर प्रतिनिधीने पाहणी केली. या पाहणीमध्ये बहुतांश ठिकाणी दुचाकीस्वार बिनदिक्कतपणे वाहने चालवितांना मोबाईलवर बोलताना आढळून आले. या दुचाकीस्वारामुळे अनेक ठिकाणी अन्य वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. या दुचाकीस्वारामुळे काही ठिकाणी तर अन्य वाहनधारकांना किरकोळ अपघातांनाही सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी तर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयासमोरुनच हे दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत वाहन चालवितांना आढळून आले. परंतु, जसे वाहतूक कर्मचारी गाडी चालविण्याचा परवाना विचारून तसेच ट्रीपलसीट असलेल्या वाहनधारकांवर कारवाई करतात, तसे मोबाईलवरुन बोलत जाणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुुळे याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी लक्ष देऊन वाहने चालविताना मोबाईलवर बोलणाºया वाहनधारकांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
परभणी : बेशिस्त वाहनचालकांचा नागरिकांना त्रास, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; किरकोळ अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:44 AM