लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल कार्ड धारकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील ७८ हजार ११९ रेशन कार्डवरील ३ लाख ३६ हजार नागरिकांना लाभ मिळणार आहे.कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी रास्ट्रीय अन्न सरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याशिवाय प्रतिसदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. याबाबत ३१ मार्च रोजी आदेश काढण्यात आले आहेत.आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट न झालेल्या व एक लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.शेतकरी योजनेंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळत नाही, अशा लाभार्थ्यांना हे धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यामध्ये सदरील लाभार्थ्यास ८ रुपये प्रति किलो दराने प्रतिव्यक्ती प्रतिमाह ३ किलो गहू व १२ रुपये प्रति किलो दराने प्रति व्यक्ती प्रतिमाह २ किलो तांदुळ मिळणार आहे.या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७८ हजार ११९ रेशन कार्डवरील ३ लाख ३६ हजार ७७१ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्ह्याला १ हजार १० मे टन गहू तर ६७४ मे टन तांदुळ असे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.आधार सीडींग नसले तरी धान्य मिळणार४एपीएलमधील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे संबधित रेशन कार्ड धारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील, अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल तरी त्या रेशनकार्डधारकांना शासनाने निश्चित केलेल्या दराने व परिमाणात धान्य देण्यात यावे, असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. सदरील रेशन कार्डधारकांना धान्य देत असताना शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर तपशील स्वतंत्र वहीमध्ये नोंद करून घ्यावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
परभणी : सव्वा तीन लाख नागरिकांना सवलतीचे धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:19 PM