लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोगस बियाणे व पीक विम्या संदर्भात चर्चा करण्यात आली़ यामध्ये पीक विम्याबाबत गतवर्षी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असा सज्जड इशारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाºयांनी दिला़जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली़ बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषी व पशूसंवर्धन सभापती श्रीनिवास मुंडे यांची तर व्यासपीठावर बांधकाम सभापती अशोक काकडे, जि़प़ सदस्य अजय चौधरी, डॉ़ सुभाष कदम, राजेंद्र लहाने, नानासाहेब राऊत, गोविंद देशमुख, प्रसाद बुधवंत, कुंडलिग सोगे, शंकर वाघमारे, कादरभाई गुळखंडकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी झालेल्या चर्चेत जि़प़ सदस्य डॉ़ कदम यांनी पीक कापणी प्रयोग हे अचूक व नियमानुसार करण्यात यावेत़, गतवर्षी हे प्रयोग व्यवस्थित झाले नसल्याने शेतकºयांना पीक विमा समाधानकारक मिळाला नाही़ त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना केली़ कृषी सभापती मुंडे यांनीही कृषी विभागातील काही अधिकाºयांच्या कामचुकारपणामुळे अनेक शेतकºयांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले़ यावर्षी अशी चूक खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला़ तसेच बोगस बियाणांची विक्री करणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असेही यावेळी मुंडे म्हणाले़ जि़प़ सदस्य अजय चौधरी यांनीही पीक विम्याबाबत अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगितले़ यावेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, पीक कापणी प्रयोग, समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे़ या समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, जि़प़ सदस्य व प्रगतीशील शेतकरी यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील बिगर कर्जदार शेतकºयांनी २४ जुलैपर्यंत तर कर्जदार शेतकºयांनी ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरावा, असे आवाहन केले़ कृषी निविष्ठांच्या नवीन परवाने व नूतनीकरणाच्या कामास विलंब होत आहे़ त्यामुळे याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे सभापती काकडे यांनी सांगितले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी बळीराम कच्छवे यांनी केले़ बैठकीच्या प्रारंभी दिवंगत कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़
परभणी : आढावा बैठकीत बोगस बियाणे अन् पीकविम्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:03 AM