लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरात अनेक घटना घडल्याने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील एकरुखा येथील गजानन गंगाधर पुंड हे १ आॅक्टोबर रोजी दुचाकी घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आले होते़ रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन ते परत गावाकडे जाणार होते़ त्यांनी जिल्हा रुग्णालयातील परिसरात दुचाकी उभी केली़ नातेवाईकांना भेटून ते परत आले तेव्हा दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़पुंड यांनी रुग्णालय परिसर आणि इतर ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला़ परंतु, ती सापडली नाही़ त्यामुळे ६ आॅक्टोबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली आहे़ एमएच २२ वाय- १०८७ या क्रमांकाची दुचाकी जिल्हा रुग्णालय परिसरातून चोरीला गेली असून, २० हजार रुपये किंमतीची ही दुचाकी असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून गुन्हा नोंद झाला़ जमादार मुंडे तपास करीत आहेत़जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दररोज शेकडो नागरिक येतात़ ग्रामीण भागातून अनेक जण दुचाकी घेऊन शहरात दाखल होतात़ त्यामुळे नेहमीच या ठिकाणी दुचाकींचा गराडा असतो. या संधीचा फायदा घेत रुग्णालयातील दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत़मागील महिनाभरात जवळपास २५ दुचाकी या ठिकाणाहून चोरी झाल्याची माहिती मिळाली़ मात्र दुचाकी चोरांचा अद्यापही बंदोबस्त झाला नाही़ पोलीस प्रशासनाने रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे़
परभणी जिल्हा रुग्णालय :दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:12 AM