लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.जिल्ह्यात ९ तालुक्यातील ८५० खेड्यांचा समावेश आहे. परंतु, खेड्यातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एकही धड रस्ता जिल्ह्यात सध्या शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रस्त्यांवर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत.अनेक वेळा खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलनेही केली; परंतु, अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्तीचे कामे प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांना अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्त्यांची कामे करण्यात यावीत, यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास ७८ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच मानवत, सोनपेठ, पाथरी, परभणी, जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड आणि पूर्णा या तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.या रस्त्यांचा आहे समावेशमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २३ रस्त्यांच्या कामासाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील टाकळी- आर्वी- कुंभारी, आनंदवाडी रस्ता, एकरुखा रस्ता, वांगी, नांदखेडा- सनपुरी- नांदापूर, झरी-मिर्झापूर तसेच मानवत तालुक्यातील सावळी- किन्होळा, वझूर बु.- वझूर खु., सोनपेठ तालुक्यातील शिर्शी -कान्हेगाव- खडका, पाथरी तालुक्यातील हादगाव- नाथ्रा रस्ता, जिंतूर तालुक्यातील जिंतूर- घेवडा- खरदरी रस्ता, खडकपाटी- राव्हा, बोरी- वाघी- जवळा, बामणी -कौठा- चौधरणी- बदनापूर, सेलू तालुक्यातील खुपसा- शिराळा, निपाणी टाकळी- करडगाव, सालेगाव रस्ता, पालम तालुक्यातील नाव्हा- नाव्हलगाव- खोरस, गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव रस्ता, आबूजवाडी- लिंबेवाडी- गुंजेगाव, खादगाव- हरंगुळ, पूर्णा तालुक्यातील कावलगाव- कावलगाववाडी ते धानोरा मोत्या, आहेरवाडी रस्ता. जिल्ह्यातील या ग्रामीण रस्त्यांचा या कामात समावेश आहे.१४३ कि.मी.चे होणार रस्तेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०१७-१८ या वित्तीय वर्षात १४३ कि.मी.रस्त्यांसाठी ७८ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी १४३ कि.मी.च्या रस्त्याचा कायापालट होणार आहे. तसेच या रस्त्याच्या कामांची नियमित देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ५ वर्षे राहणार आहे. त्यासाठी सुद्धा तब्बल ५ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात२३ रस्त्यांचे भाग्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:15 AM