लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावागावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअर, हातपंप, सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरींचे पाणी आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासले जाते. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की, नाही? याची तपासणी केली जाते. आरोग्य प्रयोगशाळेने एप्रिल महिन्यात धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९, कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ , महातपुरी आरोग्य केंद्रांतर्गत १४, पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० आणि राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ असे ७० पाण्याचे नमूने तपासले. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ नमुन्यांपैकी खळी तांडा येथील सरकारी योजनेचे २ पाणी नमूने, मातंगवाडा येथील बोअर असे ३ नमूने दुषित आढळले. कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आंतरवेली येथील अमराईची विहीर, बडवणी येथील महादेव मंदिराजवळील आणि जैशोद्दीन पठाण यांचा बोअर आणि आनंदनगर येथील वैजनाथराव मुंडे यांच्या विहिरीच्या पाण्याचे नमूने दुषित आढळले. पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० नमुन्यांपैकी सुप्पा तांडा येथील राठोड यांचा बोअर, देवकतवाडी येथील अंगणवाडीच्या बाजूचा बोअर, धर्मापुरी तांडा येथील राठोड यांचा बोअर, इसाद येथील जिजाऊ चौक व शास्त्रीनगरातील बोअर, बोर्डा समाज मंदिरासमोरील हातपंप, जिल्हा परिषद शाळेसमोरील टाकी, हनुमान नगर तांडा येथील बोअर असे ८ पाण्याचे नमूने दुषित आढळले. राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासलेल्या ९ पाणी नमुन्यांपैकी घटांग्रा येथील २ हातपंप व गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेसमोरील हातपंप असे ३ ठिकाणचे पाणी नमुुने दुषित आढळले. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासलेल्या १४ पाणी नमुन्यांपैकी एकही नमुना दुषित आढळला नाही, असे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ पी.जी. भरणे यांनी ३ मे रोजी गंगाखेड तालुका आरोग्य अधिकारी यु.बी. बिराजदार यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.जलजन्य रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जोखीमग्रस्त गावातील पाणी नमुने तपासून घेण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांचे शुद्धीकरण करणे, नळ गळत्या शोधून काढणे, हातपंपाच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. हा अहवाल प्राप्त होताच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने संबंधित गावांच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.शुद्धीकरणानंतर पाण्याचा वापर४सद्य स्थितीत पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असल्याने तालुक्यातील गावागावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा स्त्रोतातून दुषित पाणी येत असल्याचे समोर आले. याचे प्रमाण केवळ २५.७१ टक्के एवढे असल्याने दुषित पाणी नमुने असलेल्या स्त्रोतांमध्ये ईकोलाय नावाचे ब्लिचिंग पावडर वापरून पाण्याचे शुद्धीकरण करून घ्यावे. त्यानंतरच या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, असे आवाहन डॉ. यु.बी. बिराजदार यांनी केले आहे.
परभणी : १२ गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमूने दुषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:52 AM