लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५़३० च्या सुमारास हा प्रकार घडला़येथील उड्डाण पुलावरून बसस्थानक, गंगाखेड आणि पाथरीकडे जाण्याचा मार्ग आहे़ उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी ५़३० च्या सुमारास एमपी ०७ एचबी-७५९५ आणि आऱजे़ ११ जीबी-१८७५ हे दोन ट्रक उभे करून दोन्ही ट्रकचे चालक मोबाईलवर बोलत होते़ या वाहनांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक खोळंबली़ तिन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़याच दरम्यान, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे या ठिकाणावरून जात असताना त्यांना ही बाब निदर्शनास आली़ बगाटे यांनी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले़ त्यानंतर स्वत: या ठिकाणी उभे राहून वाहतूक सुरळीत केली़दरम्यान, ज्या दोन वाहनांमुळे ही वाहतूक खोळंबली होती़ ते दोन्ही ट्रक पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आणून दोन्ही ट्रक चालकांना प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला़
परभणी : ट्रक चालकांच्या निष्काळजीमुळे शहरातील वाहतूक खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:55 PM