लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील कारला ते कुंभारी बाजार या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुलाचे काम सुरु आहे; परंतु, हे काम संथ गतीने होत असल्याने येत्या काही दिवसांत पावसाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. परिणामी प्रवाशांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते काष्टगाव या मार्गावरील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर व कारला ते कुंभारी या रस्त्यावर मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूरही झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा निघून कामास सुरुवात झाली आहे; परंतु, अद्यापही शहापूर ते टाकळी कुंभकर्ण व कारला ते कुंभारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कारला- कुंभारी या रस्त्यावर एका ओढ्यावरील पुलाचे काम सुरु आहे. मागील तीन महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु असून सद्यस्थितीत अर्धवट आहे; परंतु, या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच प्रमाणे कुंभारी व कारला येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती याच रस्त्यालगत आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, जेणेकरुन पावसाळ्यात हा रस्ता बंद होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ही बाब बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याने रस्ता व पुलाची कामे संथ गतीने असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.रस्ताही अडकला४मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण व शहापूर या साडेचार कि.मी. रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे; परंतु, अद्यापही पूर्णत्वास आले नाही. केवळ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये एक-दोन पाऊस जरी झाला तरी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद होणार आहे.४या रस्त्यावरुन आर्वी, शहापूर, तुळजापूर, वाडी, डिग्रस, कुंभारी बाजार, कारला इ. दहा गावांतील वाहनधारकांची मोठी वर्दळ असते; परंतु, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे चार महिने वाहनधारकांना व प्रवाशांना परभणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
परभणी: पुलाच्या संथ कामामुळे वाहतूक होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:31 AM