प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत़ पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना आपल्या कामांनाही मुरड घालावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, महागाईच्या भडका होत असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे़मागील १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे़ दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारणपणे ८२़४० रुपये लिटर या दराने मिळणारे पेट्रोल सध्या मात्र ८७़७५ पैसे लिटर या दराने विक्री होत आहे़ दोन महिन्यांमध्ये ५ रुपये ३५ पैशांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत़ विशेष म्हणजे परभणी शहरातच वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचे वेगवेगळे दर पहावयास मिळत आहेत़ प्रत्येक पेट्रोल पंपावर २० पैसे ते ५० पैशांच्या पैट्रोलच्या दरामध्ये फरक असल्याचे दिसून येत आहे़ एकंदर शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या किंमती भडकल्याने त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे़ बाहेरून परभणीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येणारा मालही जादा किंमतीने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे़ दोन महिन्यांपूर्वी परभणी शहरामध्ये ८२़४० रुपये लिटर या दराने पेट्रोलची विक्री होत होती़ सर्वसामान्य ग्राहक लिटरनुसार पेट्रोल भरण्याऐवजी १०० रुपये, २०० रुपये अशा पटीत पेट्रोल भरतात़ १०० रुपयांमध्ये सव्वा लिटर पेट्रोल मिळत असे; परंतु, सध्या मात्र पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने १०० रुपयांमध्ये १ लिटर आणि जास्तीत जास्त १० पॉर्इंट पेट्रोल मिळत आहे़ परिणामी दिवसभराचे कामकाज यात भागत नसल्याने पेट्रोलवरील खर्च वाढला आहे़ पेट्रोल बरोबरच डिझेलचे दरही वाढल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे़ डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे पर्यायाने व्यावसायिक वाहनाच्या दरातही वाढ झाली आहे़ त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेतील मालावर होत आहे़ सद्यस्थितीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम झाल्याचेही दिसत आहे़ परभणी शहरात मागील काही वर्षांमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या पटीने वाढली आहे़ त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतही वाढ झाली आहे़ प्रत्येक बाबीसाठी इंधन म्हणून पेट्रोल, डिझेलचा वापर वाढला़ त्यातच शासनाने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले नसल्याने सामान्य नागरिकांना मात्र आर्थिक झळा सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यात दररोज पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने होत आहेत़ केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला जात आहे़ परंतु, सामान्य माणसाच्या खिशाला लागणारी झळ मात्र कमी होत नसल्याने इंधनाच्या दरवाढीवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़पेट्रोल, डिझेल विक्रीवरही परिणामदररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव बदलत असल्याने पेट्रोल, डिझेल व्यवसायावर परिणाम झाला आहे़ सर्वसाधारणपणे एका पेट्रोलपंपावर सुमारे चार ते साडेचार हजार लिटर पेट्रोलची दिवसभरात विक्री होते़ मात्र भाववाढीनंतर दिवसभरातून ५०० ते ७०० लिटर विक्री कमी होत असल्याची बाबही पेट्रोलपंप चालकांनी निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे भाववाढ झाली असली तरी पंप चालकांनाही नुकसान सहन करावे लागत आहे़वाढीव कराचा फटकाउपलब्ध झालेल्या माहितीनुसार ५९़४२ रुपये प्रतिलिटर ही पेट्रोलची मूळ किंमत आहे़ या किंमतीवर ४० टक्के वॅट लावला जातो़ तसेच टोल चार्जेस, एक्साईज ड्युटी आणि वाहतूक खर्चही किंमतीमध्ये लावला जातो़ त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे़प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दरपरभणीसह इतर जिल्ह्यांना सोलापूर, अकोला, मनमाड या ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो़ हे इंधन पुरवित असताना वाहतूक खर्चही लावला जातो़ त्यामुळे तेल डेपो ते पेट्रोलपंपापर्यंतचा वाहतूक खर्चही इंधनाच्या किंमतीत समाविष्ठ होत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर आहेत़ अंतराच्या हिशोबाने इंधनाच्या किंमतीत फरक पडतो़ सर्वसाधारणपणे लिटरमागे १५ ते २० पैसे हा खर्च अपेक्षित असताना तब्बल १़२० रुपयांपर्यंत वाहतूक खर्च लावला जात आहे़जास्तीचे पैसे घेऊन होते ग्राहकांची लूटपेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक वेळी ठराविक पैशांमध्ये निश्चित केले जातात़ जसे सध्या पेट्रोलचा दर प्रतीलिटर ८७़७५ पैसे आहे़ मात्र ५ पैसे, २० पैसे चलनातच नाहीत़ अशा वेळी पेट्रोलपंप चालक ग्राहकांकडून ८८ रुपये वसूल करतात़ यातून प्रत्येक लिटरमागे ग्राहकांची लूट होत आहे़ जे पैसे चलनात नाहीत, त्या चलनातच पेट्रोलचे दर कसे काय? ठेवले जातात, असा सवालही उपस्थित होत आहे़परभणी जिल्ह्यात सर्वाधिक दरप्रत्येक जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असले तरी परभणी जिल्ह्यात मात्र पेट्रोलचे भाव सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे़ परभणी जिल्ह्यात ८७़७५ रुपये प्रति लिटर, औरंगाबाद जिल्ह्यात ८७़१० रुपये प्रतिलिटर, सोलापूर जिल्ह्यात ८६़६७ रुपये प्रतिलिटर तर नागपूर जिल्ह्यात ८६़५९ रुपये प्रतिलिटर या दराने पेट्रोलची विक्री होत आहे़
परभणी : पेट्रोल दरवाढीने आर्थिक गणिते कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:55 PM