लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य ग्रामीण मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केले; परंतु, या रस्ता कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत़ तालुक्यातील नाथ्रा ते नाथ्रा फाटा या १२ किमी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्यावर पावसात चिखल होत आहे़ परिणामी या रस्त्यावरील वाहतूक बंद होत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़पाथरी-आष्टी या राज्य रस्त्यावर हादगावच्या पुढे नाथ्रा फाटा आहे़ नाथ्रा फाटा ते नाथ्रा हा १२ किमीचा रस्ता आहे़ या रस्त्यावर नाथ्रा गावासह कासापुरी, जवळा झुटा, पाथरगव्हाण, केदार वस्ती या गावातील वाहतूक आहे़ मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या भागातील रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली होती़ रस्ता खराब असल्याने अनेक वेळा नाथ्रा येथील ग्रामस्थ गोदावरी नदीच्या पलीकडे माजलगाव तालुक्यातील गावातून ये-जा करीत असत़मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या १२ किमी रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा २ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता़ गतवर्षी ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरूही केले होते़ डिसेंबर २०१८ मध्ये रस्त्याच्या मधोमधच्या भागामध्ये खडी टाकून रस्ता काम सुरू केले़ परंतु, काही दिवसांतच रस्त्याचे काम सुरू केले़ त्यामुळे या भागातील ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला़ उन्हाळ्याच्या शेवटी एप्रिल, मे महिन्यामध्ये पुन्हा रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू झाले़ १२ किमी रस्ता मजबुतीकरण करण्यात आल्यानंतर बाजूने टाकलेला मुरूम भर पावसाळ्यात रहदारीसाठी अडथळा निर्माण करू लागला आहे़कामाच्या दर्जाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे़ थोडासा पाऊस पडला की, चारचाकी, दुचाकी वाहने या रस्त्यावरून नेता येत नाहीत़ विशेष म्हणजे, या भागातून शहरात शिक्षणासाठी येणाºया शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिंनीची संख्या मोठी आहे़ दररोज २०० विद्यार्थी ये-जा करतात़ परंतु, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत़ त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावरील एसटी महामंडळाची धावणारी बस बंद होते़ परिणामी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने शाळा सोडून घरी बसावे लागत आहे़मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार नित्याचाच होत असल्याने नाथ्रा फाटा ते नाथ्रा या १२ किमी रस्त्यावरील येणाºया गावांतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़; परंतु, शिवस्वराज्य, महाजनादेश यात्रेत मग्न असलेल्या लोकप्रतिनिधींना मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचेच दिसून येत आहे़थोड्याही पावसाने बससेवा होते बंद४पाथरी आगारातून पाथरी ते नाथ्रा आणि पाथरी ते कासापुरी या बस दिवसभरात पहाटे ६़३० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेºया मारतात़ त्याचबरोबर या बसेसला गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकासची बसही याच रस्त्यावरून धावते़४७ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला रस्ता वाहतुकीसाठी व प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ होईल, या अपेक्षेवर असलेल्या ग्रामस्थांना मात्र आपल्या अपेक्षेवर पाणीच फेरावे लागले आहे़ कारण नाथ्रा व परिसरात थोडासा पाऊस झाला की पाथरी आगारातून धावणाºया या बसेसला सुटी दिली जाते़ परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो़जि़प़ प्रशासनाचे दुर्लक्ष४नाथ्रा ते नाथ्रा फाटा या १२ किमी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे़ त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणे जि़प़ प्रशासनाचे काम होते़; परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या रस्त्याचे ना काम पूर्ण झाले ना रस्ता तयार करताना कामाची गुणवत्ता राखली गेली़ तेव्हा जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
परभणी : अर्धवट रस्त्यामुळे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:51 PM