तुकाराम सर्जे।लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे.जिंतूर तालुक्यातील मोठे गाव म्हणून कौसडी गावाची ओळख आहे. कौसडी येथील ग्रामस्थांना बाजारहाट, खरेदी-विक्री व दळणवळणासाठी बोरी गाव गाठावे लागते. तसेच कौसडी व बोरी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या सर्व बाबींचा विचार करुन संबंधित सरपंच व लोकप्रतिनिधींनी कौसडी - बोरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. ही मागणी ग्राह्य धरुन राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी देऊन दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यानुसार जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून बोरी- कौसडी रस्त्याचे काम आठ महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले; परंतु, हे काम करीत असताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात आले नाही. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ८ महिनेही उलटले नाहीत, तोच हा रस्ता जागोजागी उखडला आहे. काही ठिकाणी तर हा रस्ता पूर्णत: दबला आहे. या रस्त्याच्या देखभाल दुुरुस्तीसाठी ५ वर्षाचा कालावधी संबंधित गुत्तेदारांना देण्यात आला आहे; परंतु, या गुत्तेदाराचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दीड कोटी रुपये खर्च करुन ८ महिन्यातच रस्ता उखडल्याचे बोरी, कौसडी ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत ?जिंतूर तालुक्यातील बोरी- कौसडी या रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून मंजुरी देण्यात आली. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन देण्यात आला. संबंधित गुत्तेदाराने कामही सुुरु केले. हे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करणे आवश्यक होते; परंतु, अधिकाºयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे केवळ आठ महिन्यातच हा रस्ता उखडला आहे. त्यामुुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या रस्त्याच्या कामाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले की काय, असा संतप्त सवाल कौसडी ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.बोरी- कौसडी हा रस्ता जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्याला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; परंतु, निकृष्ट कामांमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहनधारकांचा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिंतूर विभागाच्या उपअभियंत्याकडे रस्त्याबाबत कौसडी येथील तातेराव बारवकर यांनी तक्रार केली आहे.
परभणी : दीड कोटीच्या रस्त्याची आठ महिन्यांत चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:15 AM