लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या कृषी विद्युत पंपाचा वीज पुरवठा २ एप्रिल रोजी महावितरण व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने खंडित केला.यावर्षी जलाशयात अत्यल्प पाणीसाठा असतानाही परिसरातील शेतकरी कृषीपंपाद्वारे रात्रं-दिवस पाण्याचा बेसुमार उपसा करीत आहेत. या जलाशयातील पाण्यावर जिंतूर, परभणी शहरासह अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची मदार आहे; परंतु, दिवसेंदिवस पाणी पातळी घटत असल्याने या जलाशयावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व तहसील कार्यालयाच्या पथकाने २ एप्रिल रोजी संयुक्त कारवाई करीत जलाशयातून पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडित केला. या पथकामध्ये नायब तहसीलदार एम.आर. सोनवणे, मंडळ अधिकारी प्रशांत राख, तलाठी खिल्लारे, महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.एम. बावळे, डी.ई. कुचर, एस.एम. सिद्दीकी, एन.पी. पोले, जी.के. ढवळे, शेख महेबुब, शेख सईद यांचा समावेश होता.
परभणी: कृषीपंपाची तोडली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 11:39 PM