लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या जॉबकार्डधारक मजुरांच्या यादीत नोकरदार, व्यापाºयांसह धनदाडग्यांचा भरणा केल्याचा प्रकार तालुक्यातील खळी गावची नोंदणीकृत यादी काढल्यानंतर समोर आला आहे.तालुक्यातील प्रत्येक गावातील मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने गावनिहाय मजुरांची नोंदणी करून नोंदणीधारक मजुरांना जॉबकार्ड उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार खळी गावातील नोंदणीकृत मजुरांची यादी काढून यादीतील मजुरांच्या नावाची पडताळणी केली असता २००८ ते २०१८ या कालावधीत नोंंदणी झालेल्या १६४३ जॉबकार्डधारक मजुरांच्या यादीत शिक्षक, व्यापारी, जमीनदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, बँक कर्मचारी यांच्याबरोबरच गावाबाहेर मुंबई, परभणी, गंगाखेड, पंढरपूर आदी शहरात राहणाºया धनदांडग्यांचा समावेश करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये १३ फेब्रुवारी २००८ रोजी एका दिवसात ११६३ मजुरांंची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर १ एप्रिल २०११ ते १० जून २०११ या कालावधीत २५ मजुरांच्या नावांची नोंदणी करण्यात आली. १८ आॅक्टोबर २०१२ ते १७ डिसेंबर २०१२ या कालावधीत ३० मजुरांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. ३ डिसेंबर २०१३ रोजी पाच मजुरांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ९ जानेवारी २०१४ ते १ जुलै २०१४ या दरम्यान ३६ मजुरांची नावे यादीत घेण्यात आली. ५ जानेवारी २०१५ ते १२ डिसेंबर २०१५ या कालावधीत ८२ मजुरांची नावे नोंदविली गेली.२ जानेवारी २०१६ ते १५ एप्रिल २०१६ या दरम्यान १६२ मजुरांची नावे यादीत घेण्यात आली असल्याचे नोंदणीकृत यादीवर दिसून येत आहे. ३ जानेवारी २०१७ ते २५ डिसेंबर २०१७ या वर्षात १०३ मजुरांची नोंदणी झाल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान केवळ ३९ मजुरांची नोंदणी केल्याचे यादीवरून दिसत आहे.तालुक्यातील खळी येथील मजुरांच्या यादीची संपूर्ण पाहणी केली असता त्यामध्ये गंगाखेड शहरातील प्रतिष्ठीत व्यापाºयांच्या कुटुंबातील नावे तसेच मुंबई, पंढरपूर, परभणी यासारख्या शहरात राहणाºया धनदांडग्यांची नावे दिसून आली. त्याच बरोबर शिक्षक, उपसरपंच, नोकरदार वर्गातील कुटुंबप्रमुखांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही या मजुरांच्या यादीत दिसून आल्याने तालुकावासियातून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.५४ मजुरांची नावे केली कमीगंगाखेड तालुक्यातील खळी येथे २००८ ते २०१८ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या यादीत नोंदणी केलेल्या १६४३ मजुरांपैकी मयत झालेल्या व इतर अशा ५४ मजुरांची नावे यादीतून कमी केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील एका गावातील मजुरांच्या यादीत एवढी तफावत असेल तर तालुक्याच्या प्रत्येक गावातील याद्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजूर नोंदणी यादीची छाननी करून या यादीत गोरगरिब कुटुंबातील गरजू मजुरांना ठेवावे व इतर नोकरदार, शिक्षक, व्यापाºयांसह धनदांडग्यांना मजुरांच्या यादीतून वगळावे, त्याच बरोबर मजुरांच्या हाताला काम मिळवूून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील मजुरांमधून होत आहे.
परभणी : मजुरांच्या यादीत नोकरदार, व्यापाऱ्यांचा केला भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:45 PM