लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील २१ परीक्षा केंद्रांवर १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रथमच बायोमेट्रिकच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार आहे.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली असून निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५ समन्वय अधिकारी, २१ उपकेंद्र प्रमुख, ९८ पर्यवेक्षक, ३०४ समवेक्षक, ४६ सहायक कर्मचारी, ५४ शिपायांची नियुक्ती केली आहे.परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तही लावला असून भरारी पथकांची स्थापना केली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान २१ परीक्षा केंद्रांवर ६ हजार १२० उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.कॉपी रोखण्यासाठी कडक पावलेराज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कॉपी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे़ त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल जॅमर लावले असून, बॅग, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दूरसंचारसाठी वापरण्यात येणारे साहित्य, पुस्तके, पेपर्स, कॅलक्युलेटर्स आदी साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे़ उमेदवारांना परीक्षेला येताना प्रवेशपत्र, काळ्या शाईचा बॉलपेन व एकच मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे़ प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी उपकेंद्रांवर उपस्थित रहावे़ या ठिकाणी बायोमॅट्रिकद्वारे नोंदणी झाल्यानंतरच परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार आहे़ बायोमॅट्रिकद्वारे ओळख पडताळणी होऊ न शकल्यास पर्यायी व्यवस्थेद्वारे बायोमॅट्रिक नोंदणी झाल्यानंतरच कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले़
परभणी : बायोमेट्रिकने परीक्षार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 1:00 AM