लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी ) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हादगाव ते नाथ्रा या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने हादगाव, नाथ्रा या परिसरातील १२०० एकरवरील उसाचा प्रश्न एैरणीवर आला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७-१८ या वर्षात पाथरी तालुक्यातील हादगाव ते नाथ्रा गावापर्यंत ११.५ कि.मी. रस्त्याच्या कामाला आॅगस्ट २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. या कामासाठी ५ कोटी ३४ लाखांचा निधीही उपलब्ध झाला. या रस्त्यावर पाथरगव्हाण बु., पाथरगव्हाण खु., जवळा झुटा, नाथ्रा ही गावे येतात. या गाव परिसरातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर या भागात जवळपास १२०० एकर उसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असल्याने उसाची वाहतूक वाढली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पाथरी-आष्टी रोडवरील हादगाव ते नाथ्रा या रस्त्याच्या कामास सहा महिन्यापूर्वी मान्यता मिळाली. संबंधित गुत्तेदाराने एका महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्याच बरोबर पहिल्या तीन कि.मी. अंतरात ठेकेदाराने हा रस्ता उखडून ठेवला असून त्यावर खडी अंथरली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक या रस्त्याचे काम बंद केले आहे. खडी अंथरून रस्त्याचे काम बंद केल्यामुळे रस्त्यावरील रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या शेतकºयांच्या शेतातील उसाची तोडणी सुरू असून ऊस भरून ही वाहने या रस्त्यावरून जाताना वाहनांची टायरे घसरू लागल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हादगाव व नाथ्रा शेत शिवारातील १२०० एकरवरील उसाच्या वाहतुकीचा प्रश्न एैरणीवर आला आहे. त्यामुळे संबंंधित गुत्तेदाराने बंद केलेले रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी ऊस उत्पादकातून होत आहे.कालव्याच्या रस्त्याने करावी लागते वाहतूकहादगाव ते नाथ्रा या रस्त्यावर रहदारीची अडचण निर्माण झाल्याने या भागातील नागरिक पाथरीहून परत जात असताना वरखेड पाटीपासून जायकवाडीच्या कॅनॉलमार्गे पाथरगव्हाण खु., कासापुरी ते जवळा झुटा मार्गे नाथ्रा येथे जावे लागत आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी एक वर्षाची मुदत असून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत केवळ ३ कि.मी. रस्त्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल की, नाही? याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.हादगाव- नाथ्रा या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेले काम गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी करण्यास अडथळे निर्माण झाले असून दुचाकी वाहन सुद्धा गावापर्यंत नेता येत नाही. महामंडळाची बसही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करावे.-एकनाथ घांडगे,माजी जि.प. सदस्यरस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला मुरूम उपलब्ध झाला नसल्याने सध्या रस्त्याचे काम बंद आहे.मात्र उखडलेल्या रस्त्यावर पाणी टाकून दबई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसात हे काम होईल.-सुनील बेंबळकर, उपअभियंता, मुख्यंमत्री ग्रामसडक योजना
परभणी : रस्ता खोदल्याने १२०० एकर उसाचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:33 AM