लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहास दुसऱ्यांदा हे धरण मृतसाठ्यात गेले आहे. मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी असून, त्यात १४ टक्के गाळ असल्याचे २०११ मधील सर्वेक्षणात म्हटले होते. त्यामुळे या धरणातील पाणी प्रथमच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने परभणी, जिंतूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील २३० पाणीपुरवठा योजनांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.अर्ध्याहून अधिक मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्याच्या खाली असून धरणात सद्य स्थितीत मृत साठ्यात गाळयुक्त १०३ दलघमी एवढेच पाणी शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने पुढील उन्हाळ्याची कोणतीही परवा न करता धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातील ७२ दलघमी पाणी ३१ डिसेंबर २०१८ ते १४ जानेवारी २०१९ या काळात सिद्धेश्वर धरणात सोडले. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर येलदरीच्या मृत साठ्यातील १२४ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात पुन्हा हलविण्यात आले. यामुळे येलदरी धरणाच्या ५० वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता यावेळी अत्यंत कमी पाणीसाठा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.आणखी तीव्र उन्हाळ्याची चारही महिने बाकी असून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील सर्व लहान तलावातील पाणीसाठा संपत आला आहे. आशा वेळी येलदरी सारख्या धरणात पाणीसाठा शिल्लक ठेवणे गरजेचे होते; परंतु, जलसंपदा विभागाने येथील पाण्याचे कोणतेही नियोजन न करता धरणातील पाणी पिण्याच्या नावाखाली सिद्धेश्वर धरणात हलविले. सिद्धेश्वर धरणातून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी कमी आणि पिकांसाठी जास्त झाला, असे नागरिकांतून बोलले जात आहे.येलदरी धरणाने तळ गाठल्याने मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, जिंतूर, वसमत या शहरातील नगरपालिका या पाण्याची मागणी करतात. मात्र आता आडातच नाही तर पोहºयात येणार कोठून, या म्हणीप्रमाणे पाणीटंचाईच्या काळात प्रशासन हतबल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.९३४ दलघमीची क्षमता४येलदरी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४ दलघमी एवढी आहे. यामध्ये ८१० दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा समावतो. तर १२४ दलघमी एवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहतो. यावर्षी जानेवारी महिन्यातच धरणातील उपयुक्त पाणीसाठा सोडून देण्यात आला. व मृतसाठ्यातीलही २० दलघमी पाणी काढून देण्यात आले. आता धरणात केवळ १०३ दलघमी एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यात एकूण क्षमतेच्या म्हणजेच ९३४ दलघमी १४ टक्के गाळ असल्याचे २०११ च्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्यामुळे सध्या येलदरी धरणात जे शिल्लक पाणी आहे, ते पूर्णपणे गाळयुक्त आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला पुढील काळात पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच एप्रिल-मे या दोन महिन्यात धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
परभणी :२३० योजनांचे अस्तित्व आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:06 AM