लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकरी संपूर्ण विश्वाला धान्य पुरवठा करुन प्रत्येकाची भूक भागवितो. स्वत: मेहनत करुन धान्य पिकवितो. तो शेतकरी सर्व व्यवस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रथमस्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रमणाचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.येथील नांदखेडा रोडवरील देशमुख लेआऊट भागात श्रीश्रीश्री १००८ आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक महोत्सवात १ डिसेंबर रोजी जन्मकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना श्रमनाचार्य विशुद्धसागर महाराज म्हणाले, नेता असो वा साधु-संत, गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच अन्न-धान्याची व्यवस्था करावी लागते. ही जबाबदारी शेतकरी राजा पार पाडतो.शेतकरी पीक खराब होऊ नये म्हणून काळजी घेतो. पिकांची योग्य वाढ व्हावी म्हणून मेहनत घेतो. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करतो. त्यामुळे शेतकरी वर्गास अग्रक्रमांक दिला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रवचनानंतर आरती करण्यात आली. सांस्कृतिक तसेच इतर धार्मिक कार्यक्रमही यावेळी पार पडले. या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त, कार्यकारिणी पंचकल्याणक समिती, युवामंच आणि महिला मंडळांनी प्रयत्न केले.शोभायात्रेने महोत्सवाचा समारोप४परभणी शहरातील नांदखेडा रोड भागात २७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या पंचकल्याणक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यानिमित्त मंगल आरती करण्यात आली. त्यानंतर नांदखेडारोडवरील देशमुख लेआऊट येथून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा नानलपेठ, शिवाजीचौकमार्गे शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. हत्ती, घोडे आदींच्या सहभागामुळे शोभायात्रा आकर्षणाचा विषय ठरली होती. या शोभायात्रेत परभणी शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणी: शेतकरी हा महत्त्वाचा दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:41 AM